लिलावापूर्वीच निविदेचा गुप्त कोड मिळायचा झंवरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:18+5:302021-08-13T04:20:18+5:30
जळगाव : पूर्वनियोजित कटानुसार सुनील झंवर याने इतर आरोपींशी संगनमत करून बीएचआर संस्थेचे कामकाज ज्या सॉफ्टवेअरमधून केले जात होते ...

लिलावापूर्वीच निविदेचा गुप्त कोड मिळायचा झंवरला
जळगाव : पूर्वनियोजित कटानुसार सुनील झंवर याने इतर आरोपींशी संगनमत करून बीएचआर संस्थेचे कामकाज ज्या सॉफ्टवेअरमधून केले जात होते ते सॉफ्टवेअर स्वत:च्या कार्यालयात इन्स्टॉल करून घेतले होते. त्यासाठी त्याने कृणाल शहा याची मदत घेतली आहे. यात स्वत:चे व बीएचआरचे ही दोन्ही कार्यालये ऑनलाइन लिंक करण्यात आली होती, त्यामुळे कृणाल शहा याच्याकडून सुनील झंवर याला लिलावापूर्वीच निविदेचे गुप्त कोड मिळत होते. त्यामुळेच त्यांनी सर्वात जास्त रकमेच्या निविदा भरल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीचा तपशील हा तेथेच असणे अपेक्षित असताना तो सुनील व सूरज झंवर यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कमध्ये मिळून आला आहे. पाळधी येथील श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई मंदिर यांच्या नावाने १ लाख ५१ हजार रुपयात खरेदी केलेल्या फ्लोअर क्लिनिंग मशीनकरिता १ लाख ५ हजार ७०० रुपये रकमेच्या मुदत ठेवी बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या आहेत. या निविदेचा अर्ज सूरज झंवर याने स्वहस्ताक्षरात लिहिलेला असून सुनील झंवर या ट्रस्टचा सेक्रेटरी आहे. दरम्यान, बीएचआरचा अपहार तेथील कर्मचाऱ्यांना कळू नये यासाठी झंवर पितापुत्रांनी गैरव्यवहार व अपहाराची कागदपत्रे आपल्या खान्देश मिलमधील कार्यालयात तयार करुन घेतल्याचेदेखील पोलीस तपासात समोर आलेले आहे.
मालमत्ता विक्रीची जाहिरातही स्वत:च्याच कार्यालयात
बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीची वृत्तपत्रात देण्यात येणारी जाहिरात झंवर याने स्वत:च्याच कार्यालयात तयार केली. त्याशिवाय मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात संपूर्ण राज्यात जाहिरात देणे अपेक्षित असताना केवळ मराठी वृत्तपत्रातच जाहिरात दिल्याचे दाखविले. कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरिता ठेवी आणून देणाऱ्या एजंट व ठेवीदारांची यादीदेखील झंवरच्या कार्यालयातून जप्त केलेल्या हार्डडिस्कमध्ये मिळून आलेली आहे.
आमदार मंगेश चव्हाणांचा सहभाग तपासणार, पटेलांचा शोध सुरू
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याचे काही पुरावेदेखील हार्डडिस्कमध्ये मिळून आलेले आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी पोलिसांनी या प्रकरणात वेळोवेळी केलेल्या कारवाईची माहिती पत्र देऊन मागिलेली आहे, ती त्यांना पोलिसांनी दिलीही आहे. चव्हाण यांचा व्यवहाराशी काय संबंध याचीही तपासणी केली जात आहे. त्याशिवाय या गुन्ह्यात विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.