थेरोळ्याचा युवक दुचाकी अपघातात जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 17:34 IST2019-06-16T17:34:15+5:302019-06-16T17:34:57+5:30
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक

थेरोळ्याचा युवक दुचाकी अपघातात जागीच ठार
मुक्ताईनगर : तालुक्यातील रहिवासी व भुसावळात फायनान्स कंपनीतील कर्मचारी युवराज रामधन वाघ (२५) हा दुचाकी अपघातात ठार झाला.ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर खडसे फार्म हाऊसमोर घडली. वाघ हा युवक भुसावळ येथील फिन केयर या लघू फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. दर शनिवार व रविवार तो मुक्ताईनगर तालुक्यातील मूळ गावी थेरोळा येथे येत असतो. १५ रोजी तो दुचाकी क्रमांक एम.एच.-१९- डी. जी. १५४१ ने भुसावळकडून घोडसगाव फाटामार्गे गावी जात असताना खडसेफार्म हाऊस समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.त्यात तो जागीच ठार झाला. युवराजच्या डोक्यात हेल्मेट असतानासुद्धा त्याचा मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, दुचाकीच्या पुढचा भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. युवराजच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.३१ मेला त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्याच्यासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. उच्चशिक्षित व कमावता मुलगा गमावल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे.