मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:46 IST2021-03-08T20:46:08+5:302021-03-08T20:46:18+5:30
विदगावजळील घटना : एक गंभीर जखमी

मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू
जळगाव : मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या अशोक पोपट साबळे (२८, रा़ मेहरूण) या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री विदगावजवळ घडली. दरम्यान, या अपघातात पप्पू माळी (रा.कांचननगर) हा तरुणही जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मित्रांनी दिलेली माहिती अशी की, अशोक साबळे हा कुटुंबीयांसह मेहरूण येथे वास्तव्यास होता. हातमजुरी करून कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी हातभार लावायचा. अडावद येथे मित्राच्या हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे अशोक व त्याचा मित्र पप्पू हे दोघे शनिवारी दुपारी दुचाकीने अडावद येथे गेले होते. रात्री कार्यक्रम आटोपून दोघे दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. सुमारे बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास विदगावजवळ दुचाकी घसरून अपघात होऊन दोघे सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळले. यात अशोक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर पप्पू याच्या छातीला गंभीर दुखापत झाली़ ही घटना नातेवाईकांसह मित्रमंडळींना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशोक याला तपासणीअंती मृत घोषित केले तर पप्पू याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळीची एकच गर्दी झाली होती. अशोक याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.