जळगाव शहरात रस्त्यावरच प्रसुत झाली महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:35 IST2018-05-22T17:35:21+5:302018-05-22T17:35:21+5:30
बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा साक्षात प्रत्यय या ठिकाणी आला.

जळगाव शहरात रस्त्यावरच प्रसुत झाली महिला
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२२ : बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा साक्षात प्रत्यय या ठिकाणी आला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिता बारेला ही वेडसर महिला गेल्या काही दिवसापासून रेल्वे स्टेशन परिसरातील धर्मशाळेत वास्तव्य करीत होती. नेहमी प्रमाणे मंगळवारी अनिता बीग बजार परिसरात फिरायला गेली. गाविंदा रिक्षा स्टॉपपासून बीगबजारकडे जाणा-या रस्त्यावर तिला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या, त्यामुळे ती जागेवरच बसली. तेथे काही क्षणातच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. रस्त्यावरुन येणा-या जाणा-या लोकांना बाळ एका बाजुला तर माता दुस-या बाजुला दिसले. मात्र कोणीही त्या महिलेच्या मदतीला गेले नाही, त्यामुळे बाळ अर्धा तास ४४ अंश सेल्सीअस तापमानात उन्हात होते.
छायाचित्रकार व महिला धावली मदतीला
रस्त्यावर महिला प्रसुत झाली व बाळ उन्हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छायाचित्रकार वसीम शब्बीर खान (रा.शनी पेठ, जळगाव) हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मित्र मयुर विसावे याच्या मदतीने चादर आडवी लावून रस्त्याने जाणाºया महिलेला थांबविले. त्याचवेळी भुसावळ येथील एक महिला डॉक्टरही रस्त्याने जात होत्या. वसीम खान यांनी त्यांना मदत मागितली. त्यानंतर १०८ या शासकीय रुग्णवाहिकेला पाचारण केले. एकाच वेळी सर्वांची मदत मिळाल्यानंतर या महिलेला व तिच्या बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे दोघांवर उपचार करण्यात आले. प्रसुत महिला व तिचे बाळ दोघंही ठणठणीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.