जळगावात महिलेची सोनसाखळी लांबवली
By Admin | Updated: April 30, 2017 12:34 IST2017-04-30T12:34:46+5:302017-04-30T12:34:46+5:30
गणपती नगरातील रविवारी सकाळी स्वाध्याय भवनाजवळील घटना. काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आले चोरटे

जळगावात महिलेची सोनसाखळी लांबवली
जळगाव,दि.30- स्वाध्याय भवनात बैठकीसाठी आलेल्या ललिता प्रवीणकुमार चोपडा (वय 52, रा.दादावाडी, जळगाव) या भवनाच्या बाहेर पडताच दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजता गणपती नगरात घडली. सोनसाखळी लांबविण्याची एप्रिल महिन्यातील ही चौथी घटना आहे.
ललिता चोपडा या दररोज आकाशवाणी चौकाजवळ असलेल्या गणपती नगरातील स्वाध्याय भवनात बैठकीसाठी येतात. त्याप्रमाणे रविवारीही त्या या स्वाध्याय भवनात आल्या. बैठक आटोपून बाहेर पडताच परिसरात दबा धरुन बसलेल्या दोन जणांनी दुचाकीवरुन येवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच ललिता चोपडा यांनी आरडाओरड केली, मात्र सकाळची वेळ असल्याने गल्लीत कोणीच नव्हते. सोबत असलेल्या अन्य महिलांनी परिसरात त्यांचा शोध घेतला, परंतु उपयोग झाला नाही.