पर्समधून अंगठी लांबविताना महिलेस रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:27+5:302021-07-31T04:18:27+5:30
जळगाव : हनुमान कॉलनी येथील महिलेच्या पर्समधून सोन्याची अंगठी लांबविताना एका चोरट्या महिलेला शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता फुले मार्केट ...

पर्समधून अंगठी लांबविताना महिलेस रंगेहाथ पकडले
जळगाव : हनुमान कॉलनी येथील महिलेच्या पर्समधून सोन्याची अंगठी लांबविताना एका चोरट्या महिलेला शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता फुले मार्केट आवारातील गुप्ता शेव भांडार दुकानाजवळ रंगेहाथ पकडले. त्यानंतर महिलेला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महाबळ परिसरातील हनुमान कॉलनीतील रहिवासी कविता प्रवीण महाले या त्यांच्या मावशी सुनंदा सुधाकर चौधरी यांच्यासोबत सोने खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या. बाजारपेठेत किरकोळ खरेदी केल्यानंतर त्यांनी सोन्याची अंगठी खरेदी केली. खरेदी केलेली सोन्याची अंगठी सुनंदा चौधरी यांनी त्यांच्याकडील मोठ्या पर्समधील छोट्या पर्समध्ये ठेवली आणि त्या फुले मार्केटमधून जात होत्या. याचवेळी त्यांना गुप्ता शेव भांडारजवळ गर्दीत एका महिलेने त्यांना धक्का मारत ती महिला चौधरी यांच्या शेजारीच उभी राहिली. नंतर त्या महिलेने चौधरी यांच्या पर्समधील छोटी पर्स काढून घेतली. तेवढ्यात आपल्या धक्का लागून म्हणून वळून पाहिल्यानंतर कविता यांना धक्का मारणाऱ्या महिलेच्या हातात त्यांची छोटी पर्स दिसली. त्यांनी लागलीच त्यांच्या मावशी व नागरिकांच्या मदतीने महिलेला पकडले.
पोलिसांच्या ताब्यात दिले...
नागरिकांच्या मदतीने महाले यांनी चोरट्या महिलेच्या हातातून त्यांची पर्स ताब्यात घेतली. तपासणी केली असता, त्यात त्यांच्या मावशीसाठी घेतलेली अंगठी मिळून आली. नंतर महाले यांनी नागरिकांच्या मदतीने चोरट्या महिलेस पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने आपले नाव मीना बबन उपाळे (रा. हरिविठ्ठल नगर) असे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला अटक करीत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.