प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:36 IST2022-01-22T15:35:52+5:302022-01-22T15:36:37+5:30
डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप
जळगाव- प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी जळगावात घडली. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पूजा जयप्रकाश विश्वकर्मा असे या मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मृत पूजा यांच्या सासूबाई पुष्पा विश्वकर्मा व पती जयप्रकाश विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांना काल (शुक्रवारी) सकाळी शहरातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्या गाजरे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची नॉर्मल प्रसुती झाली. मात्र, यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना डॉ. गाजरे यांच्या रुग्णालयातून आकाशवाणी चौकातील अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी हजारो रुपयांची औषधी मागवली. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी-
विश्वकर्मा कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस देखील दाखल झाले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
डॉक्टर गाजरे म्हणतात...
पूजा विश्वकर्मा यांची प्रसूती माझ्या रुग्णालयात झाली. प्रसूतीनंतर गर्भाशय नैसर्गिकरित्या आकुंचन पावते. पण पूजा यांच्या बाबतीत तसे झाले नाही. अतिप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी योग्य तो औषधोपचार केले. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचला नाही. त्यांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, असे स्पष्टीकरण डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी दिले आहे. विश्वकर्मा कुटुंबीयांनी केलेले आरोप त्यांनी नाकारले आहेत.