जळगाव : जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित मार्ग खुला झाल्याने केळ्यांची मागणी तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:06 IST2023-03-30T16:06:34+5:302023-03-30T16:06:47+5:30
साधारण केळीलाही किमान २७०० रु. प्रतिक्विंटलचा भाव

जळगाव : जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित मार्ग खुला झाल्याने केळ्यांची मागणी तेजीत
किरण चौधरी
जळगाव : जम्मू-काश्मीरसह लद्दाखमधील बर्फाच्छादित मार्ग आता खुला झाल्याने केळीची मागणी वाढली आहे. परिणामतः निर्यातक्षम केळीला ३२०० ते ३३५० रुपयांपर्यंत, तर साधारण केळीला २७०० ते २८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
जागतिक बाजारपेठेत केळीला प्रचंड मागणी आहे. आंध्र प्रदेशातील केळी उत्पादनाचा गाशा गुंडाळला जात आहे. त्यामुळे केळी आगारातील रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, यावल व चोपडा या तालुक्यांतील केळीला मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानासोबत केळी मालाच्या उत्पादनातही हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होत आहे.
चैत्र नवरात्रोत्सव व श्रीरामनवमी आणि रमजान महिना सुरू आहे. जम्मू-काश्मीर तथा लद्दाखपर्यंतचे बर्फाच्छादित मार्ग आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे तिथे केळी मालाच्या मागणीतही वाढ झाली आहे. दुसरीकडे उत्तर भारतातून केळीची मागणी आहे. यामुळे की काय निर्यातक्षम केळी मालाला ३२०० ते ३३५० रुपये, तर साधारण केळीलाही किमान २७०० ते ३००० रु. प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे तेजीत असलेली केळीची बाजारपेठ किमान दीड-दोन महिने अशीच स्थिर राहील, असे जाणकारांचे मत आहे.
पिलबागांना उतरती कळा लागल्याने त्या केळी मालाच्या दर्जात काही अंशी घसरण होत आहे. यात गुणात्मक दर्जाप्रमाणे भावात १०० - २०० रुपयांची तफावत आढळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केळीची आवक आणि मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे केळीची तेजी अशीच स्थिर राहील. ज्यांच्या पिलबाग अत्यंत विरळ आहेत, त्यांच्या केळी मालाच्या दर्जात काहीशी घसरण होत आहे. मात्र त्यामुळे केळीच्या भावावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
डी. के. महाजन,
अध्यक्ष, सावदा केळी फळबागायतदार युनियन, रावेर
जागतिक पातळीवर केळीचा तुटवडा आहे. आपणाकडूनही निर्यात बंद आहे. मात्र, जम्मू-काश्मीर अन् लद्दाखचा मार्ग आता खुला झाला आहे. त्यामुळे केळीची बाजारपेठ तेजीत राहण्यास मोठा हातभार लागला आहे.
प्रशांत महाजन,
संचालक, महाजन बनाना एक्सपोर्ट, तांदलवाडी, ता. रावेर