शहरात लॉकडाऊन कडक होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:46 AM2020-07-01T11:46:10+5:302020-07-01T11:46:36+5:30

लोकप्रतिनिधींकडून वाढू लागली मागणी : ठाणे, मीरा-भार्इंदर मनपाने निर्णय घेतल्याने

Will lockdown tighten in the city? | शहरात लॉकडाऊन कडक होणार ?

शहरात लॉकडाऊन कडक होणार ?

Next

जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा शहरात पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे काही दिवस कडक लॉकडाऊन पुकारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपातील सत्ताधारी काही नगरसेवकांनीदेखील याबाबत मागणी केली आहे. ठाणे, मीरा-भार्इंदर महापालिकेनेदेखील तेथे रुग्ण वाढत असल्याने ११ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच जळगाव शहरातदेखील निर्णय घेण्यात यावा असेही काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे रस्त्यांवरही दररोज गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यातच महापालिका प्रशासन शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास अपयशी ठरली आहे. महापालिकेसोबतच नागरिक देखील नियम पाळत नाहीत. राज्य शासनाने ही ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे संपुर्ण महिना नाही मात्र ११ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याबाबत दोन दिवसात काही पदाधिकारी आयुक्तांशी चर्चा करणार आहेत.
शहर रेडझोनमध्ये असल्याने मार्केटमधील दुकाने उघडण्यास बंदी आहे. त्यामुळे जळगाव शहर जोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कायम राहिल तोपर्यंत दुकाने उघडता येणार नाहीत. यासाठी मनपाने ११ ते १५ दिवस कडक लॉकडाऊन जर पाडला तर रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येईल व शहर रेडझोनमधून बाहेर येईल असे मत दोन आठवड्यांपुर्वी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते.
तसेच स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी देखील जर शहराला रेडझोनमधून बाहेर काढायचे असेल तर काही दिवस कडक लॉकडाऊन करावा लागेल असे मत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले होते.

शहरात कडक लॉकडाऊनबाबत मनपा आयुक्तांना अधिकार आहे की नाही ? याबाबतची बुधवारी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. इतर मनपा जर रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेवू शकतात तर याबाबत काही मार्ग काढावा लागेल.
-भारती सोनवणे, महापौर

Web Title: Will lockdown tighten in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.