जळगावमध्ये पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीची आत्महत्या
By विजय.सैतवाल | Updated: August 22, 2023 17:00 IST2023-08-22T16:59:25+5:302023-08-22T17:00:12+5:30
३२ वर्षीय तरुणाने नोव्हेंबर २०२१ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

जळगावमध्ये पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीची आत्महत्या
जळगाव : पत्नीचे प्रेमसंबंध असलेल्या तरुणाला समजावण्यास गेलेल्या पतीला शिवीगाळ करीत धमक्या दिल्याने व पत्नीही वारंवार भांडण करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून शहरातील एका तरुणाने आत्महत्या केली. पावणे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी मयताच्या भावाने फिर्याद दिल्याने २१ ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एका भागात राहत असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने नोव्हेंबर २०२१ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता मयताच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्याच्या भावाच्या पत्नीशी अजय ज्ञानेश्वर शिंदे (३५, रा. गेंदालाल मिल) याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती भावाला समजली. त्यामुळे तो अजयला समजावण्यास गेला असता त्याला शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच त्यानंतरही फोन करून धमकी द्यायचा की, तुझ्या पत्नीशी माझे प्रेमसंबंध आहे. तिला एक दिवस पळवून घेऊन जाईल. तुझ्याकडून काय होईल, करून घे. या धमक्यांसह मयताची पत्नीदेखील काही ना काही कारणावरून भांडण करीत असे. त्यामुळे दोघांच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली.
हा प्रकार ऑक्टोबर २०२० ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सुरू होता. त्यानंतर आता मयताच्या भावाने फिर्याद दिली. त्यावरून मयताची पत्नी व तिचा प्रियकर अजय ज्ञानेश्वर शिंदे या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश शेंडे करीत आहेत.