शिरसोली, म्हसावद व धानवडला सरपंच कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:12+5:302021-02-05T06:00:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.न., धानवड आणि म्हसावद या तीन गावांना ज्या प्रवर्गाचे आरक्षण मिळाले आहे, ...

शिरसोली, म्हसावद व धानवडला सरपंच कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.न., धानवड आणि म्हसावद या तीन गावांना ज्या प्रवर्गाचे आरक्षण मिळाले आहे, त्यानुसार या गावांमध्ये सरपंचपदासाठी उमेदवारच नाहीत. त्यामुळे सरपंच करायचे तरी कुणाला, हा प्रश्न पडला आहे.
जळगाव तालुक्यातील ४३ गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर तालुक्यातील संपूर्ण ७० गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण पंचायत समितीच्या सभागृहात नुकतेच जाहीर झाले. त्यात तहसीलदार यांना सुरुवातीला सकाळी सरपंचपदासाठी गावानुसार पदे आरक्षित करायची होती. त्यानंतर या आरक्षित पदांमधून प्रांत अधिकारी हे महिला आरक्षण काढणार होते. त्यानुसार तहसीलदारांनी आरक्षित पदे काढली. त्यानंतर गावागावात एकच जल्लोष सुरू झाला. तालुक्यातील मोठे गाव असलेल्या म्हसावद आणि शिरसोली प्र.न. या दोन गावांमध्ये गुलाल उधळला गेला. पण त्या वेळी महिलांचे सरपंचपद राखीव झालेले नव्हते. दुपारी चार वाजता प्रांत अधिकारी यांनी महिलांची सरपंचपदे आरक्षित केली. त्यात धानवड, शिरसोली या गावांना महिलांसाठी एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले. या दोन्ही गावांमध्ये एस.टी. प्रवर्गातून एकही महिला सदस्य निवडून आलेली नाही. त्यामुळे येथे सरपंच करायचे तरी कुणाला, असा प्रश्न उभा राहिला आहे.
म्हसावद येथेदेखील एस.सी. महिलांसाठी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र तेथेदेखील एकही एस.सी. महिला सदस्य निवडून आलेली नाही. त्यामुळे पेच कायम आहे.
सदस्यांचे आरक्षण देताना गावाच्या लोकसंख्येचा विचार केला जातो. त्यानुसार सदस्यांसाठी आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे सरपंच आरक्षण देतानाही हाच निकष लावला जातो. मात्र त्यानंतर दिलेल्या सरपंच आरक्षणातून महिलांसाठीचे आरक्षण काढले जाते. त्यात या तिन्ही गावांना सरपंचपदासाठी महिला प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले आहे.
बहुमत नसतानाही सरपंचपदाची लॉटरी
तालुक्यातील काही गावांमध्ये सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. ज्या गटाचे बहुमत आहे त्या गटाकडे आरक्षित प्रवर्गातील सदस्यच नसल्याने सरपंचपद विरोधी गटाच्या हातात जाणार आहे. तर बहुमत असलेल्या गटाला मात्र सरपंचपद मिळणार नाही.
पुढे काय होणार?
शिरसोलीतील माजी सरपंच अनिल पाटील यांनी याबाबत न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे सांगितले होते. यात एस.टी. महिला नसल्यास एस.सी किंवा ओबीसी महिलेला संधी मिळते. मात्र एस.टी. आरक्षण असल्याने त्याच प्रवर्गाला देण्याची मागणी होत आहे.