पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे अडले कुठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:21+5:302021-02-05T06:02:21+5:30
- ५ लाख नागरिकांना होणार फायदा -तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांचा ३ किमीचा फेरा वाचणार -पिंप्राळा रेल्वेगेटवर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून ...

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे अडले कुठे
- ५ लाख नागरिकांना होणार फायदा
-तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांचा ३ किमीचा फेरा वाचणार
-पिंप्राळा रेल्वेगेटवर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून होणार सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाला निधी मंजूर होऊन दोन वर्षे झाल्यावर देखील अद्याप कामाचा मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून ‘आर्म’च्या फेऱ्यात या पुलाचे काम थांबले होते. त्यानंतर आर्मचा देखील प्रश्न मार्गी लागला असून, अद्यापही कामाला सुरुवात होताना दिसून येत नाही. शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाप्रमाणेच हा पूलदेखील शहरवासीयांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे.
पिंप्राळा पुलाच्या कामासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच ‘महारेल’कडून हे काम केले जाणार आहे. हा निर्णय होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने एस.के. ऑइल मिल भाग व रिंगरोडकडील भागाकडे जमिनीची गुणवत्ता तपासून प्राथमिक तपासण्यादेखील पूर्ण केल्या आहेत. मात्र, मनपातील सत्ताधारी व शहरातील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी हे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे. विशेष म्हणजे भोईटेनगरकडून येणाऱ्या आर्मचा प्रश्नदेखील आता मार्गी लागला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत भोईटेनगरकडून येणाऱ्या आर्मसाठी थोड्याच मालमत्ता बाधित होणार असून, स्थानिकांनी ती जागा देण्याचीही तयारी दर्शविली आहे. तसेच मालमत्ताधारकांना नुकसान भरपाईची रक्कमदेखील दिली जाणार असल्याचा ठरावदेखील महासभेत करण्यात आला. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होऊन ‘महारेल’ला नवीन डिझाइन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रेल्वेने तयार केलेल्या नवीन डिझाइनमध्ये ‘आर्म’चा समावेश केला आहे.
आता मूल्यांकनाचे काम थांबले
आर्मच्या कामामुळे भोईटेनगरातील काही मालमत्ता बाधित होणार आहेत. या मालमत्तांचे मूल्यांकन आजच्या भावात करून, बाधितांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबत मनपा नगररचना विभागाला तीन महिन्यांपूर्वी मनपा आयुक्तांनी मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सूचना देऊन आता अनेक महिने उलटले आहेत. तरीही मनपाकडून याठिकाणी मूल्यांकन करण्यात आलेले नाही.