रावेर : तापाने फणफणत्या मुलाची प्रकृती दाखवण्यासाठी पत्नीसोबत शहरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या पोलीसदादाला एक नवजात शिशू चिंताजनक स्थितीत दिसला. त्याला पाहून पोलीसदादाला मायेचा करुणेचा फुटला आणि त्याने नातवासाठी रडणाऱ्या आजीला धीर देत स्वत:च्या कारमध्ये बसवत त्यांना येथून बऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयत नेत दाखल केले.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नीलेश लोहार हे या पोलीसदादाचे नाव असून स्वतः च्या मुलाची तब्येत डॉक्टरांना दाखवून पत्नीला रिक्षाद्वारे मुलासह घरी रवाना करत, प्रकृती चिंताजनक असलेल्या १२ दिवसांच्या बाळाला व त्याच्या आजी तथा मातेला स्वतःच्या चारचाकी कारमध्ये बसवून थेट बऱ्हाणपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन तेथील नवजात अतिदक्षता विभागात दाखल केल्याने या बालकाला जीवदान लाभले आहे. रावेरला खासगी लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये पोलीसदादा देवदूत म्हणून धावून आल्याने त्या बालकाला जीवदान लाभल्याची सद्भावना व्यक्त करीत संकटातील दु:खद अश्रूंचे अखेर आनंदाश्रूत परिवर्तन झालेल्या जन्मदात्या मातेने व आजीने पोलीसदादांचे शतजन्माचे ऋणी असल्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. खाकीतील माणूसकीचा प्रेमाने ओथंबून वाहणारा झरा चक्क त्या बाळासाठी देवदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे समाजमनातून कौतुक होत आहे.
तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री येथील शकीला सुभेदार तडवी ही ‘त्या’ नवजात शिशूची मात असून तिची सासूबाई तथा पतीची भेट घेऊन नीलेश लोहार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. बाळाच्या व आजीला वरखर्चासाठी २०० रुपयेही दिले होते.
सोमवारी पोळ्याच्या सणाच्या दिवशी दाखल केलेल्या या नवजात १२ दिवसांच्या बाळाला पाच दिवसांनी प्रकृती चांगली झाल्याने त्याची सुटका करण्यात आल्याने शकिला व सुभेदार तडवी या पती-पत्नीने नीलेश लोहार यांना फोन करून आभार मानले.