जळगावचे पहेलवान गदा नाचवणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:23 IST2018-12-01T12:21:32+5:302018-12-01T12:23:58+5:30
आकाश नेवे जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी रथोत्सवानंतर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्याची परंपरा पुन्हा सुरू ...

जळगावचे पहेलवान गदा नाचवणार कधी ?
आकाश नेवे
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थान आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी रथोत्सवानंतर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील मल्लांचे वर्चस्व या स्पर्धेवर नसल्याचे दिसून आले. गेल्या वेळी कोल्हापूरचा बाला रफिक आणि आता पंजाबचा अब्दुल गनी यांचेच वर्चस्व या स्पर्धेवर दिसून आले.
एकेकाळी जळगाव आणि जिल्ह्याला कुस्तीगिरांची चांगली परंपरा आहे. धरणगाव, जळगाव आणि चाळीसगाव भागात पहेलवानांचा दबदबा राज्यभर होता. मात्र आता जळगावच्या आखाड्यातच परगावचे पहेलवान वर्चस्व गाजवू लागेल आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने कुस्तीत झेंडा रोवला. मात्र त्याच्या नंतर जळगाव जिल्ह्यातून आणखी पुढे कोण जाईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगावचा स्थानिक पहेलवान नितीन गवळी याचे नाव सातत्याने पुढे येते. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. पूर्वी जळगावमध्ये श्रीकृष्ण व्यायामशाळा, खांबेटे व्यायामशाळा तसेच जुन्या गावात ठिकठिकाणी आखाडे होते. काळाच्या ओघात अनेक आखाडे बंद पडले. व्यायामशाळा बंद पडल्या. मात्र श्रीकृष्ण व्यायामशाळा अजूनही सुरू आहे. म्हशींच्या गोठ्याजवळ असलेली ही व्यायामशाळा अजूनही पहेलवान घडवते. शाहूनगर, मेहरूण येथेही आखाडे आहेत. मात्र कुस्ती जिंकून गदा नाचवतील अशा पहेलवानांची वानवाच आहे. कुस्तीप्रेमींचा दांडगा उत्साह कुस्त्यांच्या दंगलीत कुस्तीप्रेमींचा दांडगा उत्साह दिसून आला. सलग दोन वर्षे ही दंगल सागर पार्कवर होते. कुस्तीचा आखाडा जरी मधोमध असला तरी मैदान गदीर्ने फुलून जाते. कुस्ती शौकिन झाडांवरही उभे राहून देखील कुस्ती पाहताना दिसून येतात.