जळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण, उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारासह उपद्रवींवर पोलीस दलाकडून हद्दपारी व प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात. २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत १२६ गुन्हेगारांना वेळोवेळी वर्ष, दोन वर्षासाठी कधी जिल्हा तर कधी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही हद्दपारी कागदोपत्रीच असल्याचे कारवायांवरून दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यात जिल्ह्यातून हद्दपार झालेले तीन गुन्हेगार घरी मिळून आले. त्याशिवाय चार वर्षात १२४ जणांना हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केले आहे. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोणी घरात तर कोणी कंपनीत तर कोणता गुन्हेगार शहरात फिरताना आढळून आले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या प्रस्तावावरूनच प्रांताधिकारी हद्दपारीचे आदेश पारित करतात, मात्र त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, याची जबाबदारी पोलिसांवरच असते.
हद्दपारीनंतर जिल्ह्यात १२४ जणांना बेड्या
प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपार केल्यानंतरही या आदेशाचे उल्लंघन आपल्या हद्दीत वावरणाऱ्या १२४ जणांना चार वर्षात बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. ८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून घरी आढळलेल्या समाधान हरचंद भोई (२७, रा. खंडेराव नगर) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी शनिपेठ पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली. त्याशिवाय एमआयडीसी पोलिसांनीदेखील काही दिवसात दोघांना अटक केली होती. त्यातील एक जण एमआयडीसीत कंपनीत झोपलेला होता.
हद्दपारी कशासाठी?
एखाद्या व्यक्ती व गुन्हेगारामुळे सण, उत्सवात जातीय तणाव किंवा वाद होण्याची शक्यता असल्याने संभाव्य वाद टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) सह वेगवेगळ्या कलमान्वये हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. कुख्यात गुन्हेगारांवर तर एमपीडीएची कारवाई केली जाते. हद्दपारीतील गुन्हेगार शहर व जिल्ह्याच्या बाहेर तर एपीडीएचा गुन्हेगार हा थेट कारागृहात असतो. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठीच या कारवाया केल्या जातात.
कोट....
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक व हद्दपारीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. हद्दपार आरोपी दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात शांतता नांदावी, सण उत्सव आनंदाने साजरा व्हावेत. एकोपा निर्माण व्हावा यासाठी यापुढे देखील अशा कारवाया केल्या जातील. गुन्हेगारी व गुंडगिरी ठेचण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
वर्ष कारवाया
२०१८- ५९
२०१९- ५१
२०२०- १२
२०२१- ४