काय आहे नेमके प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:37+5:302021-09-06T04:20:37+5:30
- योगिता मालवी यांची जयश्री दादाजी फाऊंडेशन या नावाने नोंदणीकृत संस्था असून त्या सचिव तर पती उमेश मालवी अध्यक्ष ...

काय आहे नेमके प्रकरण
-
योगिता मालवी यांची जयश्री दादाजी फाऊंडेशन या नावाने नोंदणीकृत संस्था असून त्या सचिव तर पती उमेश मालवी अध्यक्ष आहेत. संस्थेच्या माध्यमातून कलश कॉम्प्युटर व जयश्री दादाजी फाउंडेशन अशी दोन प्रशिक्षण केंद्र चालविली जातात. यात ब्युटी पार्लर, शिवणक्लास, फॅशन डिझायनिंग यासह विविध प्रकारच्या कोर्सचा समावेश आहे.
-२०१८ मध्ये जयश्री दादाजी फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यात करार होऊन संस्थेमार्फत प्रशिक्षण केंद्र चालविण्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार नवीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात दिली होती. तेव्हा अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर याने योगिता मालवी यांच्याशी संपर्क करून माझ्या मायभूमी ग्रामविकास संस्थेला आयकर विभागाची मान्यता असून १२ (एए) व ८० जी प्रमाणपत्र प्राप्त असल्याने त्या आधारावर वेगवेगळ्या कंपन्यांचा सीएसआर फंड मिळतो व त्यातून आम्ही वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत असल्याचे कळविले.
-कौशल्य विकास सोसायटीच्या योजना राबविण्यासाठी निती आयोगाची मान्यता आहे असे सांगून त्याची कागदपत्रे सादर केली होती. चालू वर्षासाठी ५ कोटी व पुढील वर्षासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे कळमकर याने सांगितले. त्यामुळे मालवी यांनी त्याच्या संस्थेशी आठ कोर्स चालविण्याबाबत करार केला. या कराराप्रमाणे १७७ संस्थाचालकांनी रोखीने तसेच बँक खात्यात ३३ लाख रुपये देऊन संस्थेची नोंदणी करून घेतली. त्यात पहिल्या ४८ केंद्रांकडून १५ हजार प्रमाणे तर १२९ केंद्रांकडून २० हजार या प्रमाणे शुल्क आकारण्यात आले. तीन महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम मिळणार असल्याचे कळमकर याने सांगितले होते. १७७ केंद्रांनी १९ हजार ८६१ विद्यार्थ्यांची नोंदणी करून प्रशिक्षण घेतले.
-या बॅचेस सुरू असतानाच कळमकर याने महिला बचत गटाची योजना सांगून गृहउद्योगाच्या नावाखाली ६७४ बचत गट तयार करून प्रत्येकी एक हजार या प्रमाणे ६ लाख ७४ हजार रुपये त्यांच्याकडून जमा केले. त्यानंतर बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याच्या नावाने प्रति बचत गट ८ हजार याप्रमाणे ५३ लाख ९२ हजार रुपये पुन्हा जमा केले. यानंतर मात्र कळमकर याने कोणालाच कसलीच मदत केली नाही, उलट संपर्कच तोडला.