मित्रांच्या आग्रहाखातर जेवायला आला अन् घरी परतताना कंटेनरने चिरडले! तरुणाचा जागीच मृत्यू
By सागर दुबे | Updated: April 1, 2023 22:54 IST2023-04-01T22:52:23+5:302023-04-01T22:54:49+5:30
मृताच्या मित्रांनी दिलेली माहितीनुसार, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत कामाला असणारे १०-१२ मित्रांच्या एक ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाईमध्ये जेवणाला जाण्याचे ठरवले होते.

मित्रांच्या आग्रहाखातर जेवायला आला अन् घरी परतताना कंटेनरने चिरडले! तरुणाचा जागीच मृत्यू
जळगाव : ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही दुर्दैवी घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु. कोल्हेनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताच्या मित्रांनी दिलेली माहितीनुसार, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत कामाला असणारे १०-१२ मित्रांच्या एक ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाईमध्ये जेवणाला जाण्याचे ठरवले होते. अक्षय याने सुरुवातीला जेवणाला येण्यास नकार दिला होता. परंतू, नंतर एका मित्राच्या आग्रहाखातर तो जेवणाला सर्वात उशिरा पोहचला. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर त्याने सेल्फी काढले. त्यानंतर हॉटेलमधून आपली दुचाकी काढून घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या मित्राला सुध्दा जळगाव शहराकडे जायचे होते. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ तो देखील निघाला. पण, अक्षय हा महामार्गावर दुचाकी घेत असताना अचानक बांभोरीकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने (एम.एच.४९ ए.टी.४४०७) धडक दिली आणि अक्षय थेट कंटेनरच्या चाकाखाली आला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची घटनास्थळी धाव... -
अपघात एवढा भयंकर होता की, मृतदेहाचा छातीवरील भागचा अक्षरश: चेंदामेंदा झालेला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआय गणेश सायकर, विश्वनाथ गायकवाड, प्रवीण पाटील, जयेंद्र पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रूग्णवाहिका बोलवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, मयत अक्षयच्या मित्रांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. मयताच्या पश्चात पत्नी आणि एक चार वर्षाची मुलगी आहे. मयताच्या कुटूंबियांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले होते. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा कंटेनर चालकाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.