‘डेल्टा प्लस’चा धोका झुगारत वाकोदमध्ये भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:32+5:302021-07-11T04:12:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाकोद, ता. जामनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने आठवडे बाजारावरील बंदी अद्यापही उठवलेली नाही. सर्वत्र बाजार ...

‘डेल्टा प्लस’चा धोका झुगारत वाकोदमध्ये भरला आठवडे बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकोद, ता. जामनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने आठवडे बाजारावरील बंदी अद्यापही उठवलेली नाही. सर्वत्र बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केलेले असताना व डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या राज्यात सर्वत्र नियमावली शासनाकडून लावण्यात आलेली आहे. मात्र या सर्व नियमांना धाब्यावर बसवून कोरोनाची व डेल्टा प्लसची धास्ती झुगारत शनिवारी भरणारा आठवडे बाजार हा शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गेल्या दोन आठवड्यांपासून भरलेला पाहायला मिळत आहे. तसेच शनिवारी गुरांचा बाजारदेखील मोठ्या प्रमाणावर भरलेला पाहायला मिळत आहे.
या गुरांच्या बाजारात परिसरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. तसेच कैऱ्यांचा बाजारदेखील शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस मोठ्या प्रमाणावर भरलेला होता. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून या वाकोद बाजारात स्थानिक व्यापारी वगळता बाहेरगावातून अनेक व्यापारी मालवाहतूक गाड्यांमध्ये माल घेऊन विक्री करीत होते. यांच्या गाड्यांवर ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत होती. कोरोनाचे महासंकट असताना कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील व्यापारीदेखील येथे आले होते. कोरोना सध्या आटोक्यात आला असला तरी पूर्वनियोजन म्हणून कोरोना विषाणूची बाधा तसेच प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून सर्वत्र आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हे आवाहन झुगारून भाजीपाला, फळ, किराणा माल, खाद्यपदार्थ छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने नेहमीप्रमाणे थाटण्याचा प्रयत्न वाकोद बाजारात करण्यात आला.
विशेष म्हणजे ग्राहकदेखील नेहमीप्रमाणेच बाजारात खरेदी करण्यासाठी दाखल झाले होते. दर आठवड्याला बाहेरून येणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची संख्या वाढत असून होणाऱ्या गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नियमापलीकडे भरलेल्या या आठवडे बाजाराबाबत अनेकांनी नाराजी बोलून दाखवली. पुढे उद्भवणाऱ्या कोरोना महामारीपासून बचाव करायचा असेल तर खबरदारी घेणे गरजेचे असून, असला प्रकार टाळला जायला हवा. तसेच बाहेरगावातून येणाऱ्यांना मज्जाव करण्यात यायला हवा, अशी मागणी होत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जादेखील या बाजारात उडालेला दिसून येत आहे.