वरखेडी भोकरी येथे आठवडे बाजार बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:02+5:302021-07-02T04:12:02+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी येथे राज्यमार्गाला लागूनच आठवडे बाजार भरला. ग्रामपंचायतीने बाजार बंदची दवंडी देऊनही व्यावसायिकांनी पाचोरा-जामनेर राज्यमार्गाला ...

वरखेडी भोकरी येथे आठवडे बाजार बहरला
वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी येथे राज्यमार्गाला लागूनच आठवडे बाजार भरला. ग्रामपंचायतीने बाजार बंदची दवंडी देऊनही व्यावसायिकांनी पाचोरा-जामनेर राज्यमार्गाला लागून बॅंक ऑफ महाराष्ट्रजवळ आपली दुकाने व व्यवसाय चालविल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
याठिकाणी वाहनांची व बाजारासाठी येणाऱ्या बाया, माणसे, मुले व विक्रेते यांची फारच गर्दी होत असते. यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यतादेखील बळावते. कोरोना काळात डेल्टा प्लस विषाणूचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे या ठिकाणी तीनतेरा झाल्याचे दिसून येते.
भोकरी ग्रामपंचायत हद्दीत देखील शनिमंदिर परिसरात लोणच्याच्या कैऱ्या खरेदीसाठी ग्राहकांनी व विक्रेत्यांनी गर्दी केली होती. या ठिकाणी मास्क न वापरताच आपल्या दैनंदिनीत व्यावसायिक व ग्राहक दिसून आले. वरखेडी बाजारपेठेत ज्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजार भरतो, त्या ठिकाणी मात्र शुकशुकाट दिसून येत होता.