पाझर तलावाच्या पाण्यात चार एकर शेती पिकासह गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:54+5:302021-09-12T04:19:54+5:30
चाळीसगाव : ‘बँकेसह खासगी कर्ज घेऊन सहा एकर शेतात शेवगा लावला... मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. शेतालगत बांधलेल्या पाझर तलावाचा ...

पाझर तलावाच्या पाण्यात चार एकर शेती पिकासह गेली वाहून
चाळीसगाव : ‘बँकेसह खासगी कर्ज घेऊन सहा एकर शेतात शेवगा लावला... मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. शेतालगत बांधलेल्या पाझर तलावाचा सांडवा तसाच ठेवल्याने बुधवारी आलेल्या पुराने पिकासह शेतीच वाहून नेली. १५ फूट खोल शेतातील मातीही वाहून गेल्याने रस्त्यावर आलो आहे..’ अशी कैफियत मांडताना ६० वर्षीय पूरग्रस्त शेतकरी काशिनाथ सोनवणे ढसाढसा रडतात. गेल्या चार दिवसांपासून त्यांची चूल पेटली नाही. संपूर्ण कुटुंबावर जणू शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर शिंदी हे गाव आहे. याच गावालगत पाच कि.मी. अंतरावर १० ते १५ घरांचे खराडी हे गाव असून याच शिवारात काशिनाथ सोनवणे यांची सहा एकर शेती आहे. चाळीसगाव परिसरात सातच दिवसाच्या अंतराने ६ रोजी दुसऱ्यांदा आभाळ फाटलं. यादिवशी घोडेगावसह शिंदी, खराडी, करजगाव आदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे काहीअंशी नुकसान झाले. बुधवारी सोनवणे यांच्या शेतालगतचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. त्याचे पाणी शेतात शिरले. २०१९मध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने घोडगाव येथील मोरदऱ्या धरणाच्या उगमावर घोडेगाव रस्त्यालगत खराडी शिवारात हा पाझर तलाव बांधला. मात्र या तलावातील पाणी वाहून जाण्यासाठी काढलेला सांडवा तसाच ठेवल्याने बुधवारी आलेल्या पुराचे पाणी काशिनाथ सोनवणे यांच्या शेतात घुसले. यात त्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. नुकसान मोठे असल्याने त्यांच्यासह कुटुंबालाच याचा धक्का बसला आहे.
चौकट
जूनमध्ये लावला शेवगा
काशिनाथ सोनवणे यांना दोन मुले आहेत. तेही शेतातच राबतात. ६ एकर शेतात त्यांनी जून २०२१मध्ये शेवगा लावला. हे पीक सात महिन्यांचे असते. सद्य:स्थितीत शेवग्याच्या शेंगाना चांगला भाव आहे. एका हंगामात दोनदा उत्पन्न येते.
१..सहा एकर शेती तयार करण्यासाठी त्यांनी एकरी चार लाख रुपये खर्च केले.
२...ठिंबक सिंचनासाठी ९० रुपये खर्च आला. बुधवारी मात्र होत्याचे नव्हते झाले. सहा एकरापैकी चार एकर शेती पुरात नष्ट झाली. शेतात १५ फूट खोल खड्डा पडला असून अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा शेत तयार करण्यासाठी एकरी १० लाख रुपये खर्च येणार आहे.
.
चौकट
पाझर तलावाची मंजुरी
१९९६मध्ये काशिनाथ सोनवणे यांच्या शेतालगतचा पाझर तलाव त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरला आहे. १९९६मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या तलावाचे काम सुरू झाले. मात्र नंतर बंद पडले. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ते मंजूर केले गेले. त्यामुळे १९९६च्या कृती आराखड्यानुसार तो तयार करण्यात आला. नैसर्गिक सांडव्यात त्याचे पाणी सोडण्यात आले.
इन्फो
पाझर तलाव बांधल्यानंतर त्याचे पाणी मूळ नदीत सोडणे आवश्यक होते. मात्र ते शेतालगतच सोडून दिले. याबाबत १० मार्च रोजी अर्जही केला होता. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात गाऱ्हाणे मांडले होते. तथापि कोणतीही दखल घेतली नाही. वेळोवेळी भ्रमणध्वनीवरही उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. अखेरीस माझे शेत आणि पीकदेखील वाहून गेले.
-काशिनाथ सोनवणे
नुकसानग्रस्त शेतकरी, शिंदी, ता. चाळीसगाव
इन्फो
१९९६मध्ये बंद पडलेल्या पाझर तलावाचे काम जलयुक्त शिवार योजनेतर्गंत २०१९मध्ये झाले. मंजूर झालेले काम नियमाप्रमाणे केले आहे. सांडव्याचे पाणी नैसर्गिक नाल्यात सोडले आहे.
-सी. के. शिंपी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प. चाळीसगाव विभाग