जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निवारार्थची दोन कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:45 IST2018-04-11T12:45:18+5:302018-04-11T12:45:18+5:30
दोन महिने उलटूनही कामे पूर्ण होईना

जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निवारार्थची दोन कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यामध्ये विहिर खोलीकरण, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, विशेष दुरुस्ती अंतर्गत ५९ गावांमध्ये ५९ कामे प्रस्तावित असून अंदाजपत्रकीय किंमतीनुसार त्यांचा एकूण खर्च २ कोटी ४२ लाख ४३ हजार ९३४ रुपये असून या कामांना अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने ही कामे सुरूच झाली नसल्याचे चित्र आहे.
जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जिल्ह्यात विहिर खोलीकरण व तात्पुरता पाणी पुरवठ्यासह एकूण २० कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून यात केवळ दोनच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच एकूण ६२ गावांमध्ये १६७ विंधन विहीरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यातील केवळ १४ कामे झाली असून १५३ विहिरींचे कामे अद्यापही सुरूच आहेत. कुपनलिकांसाठी १५ गावांमध्ये ३६ कामे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दोनच कामे झालेली असून ३४ कुपनलिकांची कामे सुरू आहेत. उन्हाळ््याची दोन महिने उलटले तरी अद्यापही टंचाई निवारणाची कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
८८९ गावे पाणी टंचाईच्या छायेत
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा -२ मध्ये ५७ कोटी ९८ लाख निधीतून ५५७ कामे घेण्यात आली असून त्यापैकी ५४२ कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील ३ हजार ५५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. असे असले तरी टंचाईची समस्या कायम असून ८८९ गावे पाणी टंचाईच्या छायेत आहेत. सद्यस्थितीत ७७ गावांमध्ये ४१ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिंचनाची कामे केवळ कागदोपत्री झाली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
१३६ विहिरी अधिग्रहीत
जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १३८ गावांमध्ये १३६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे.
पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर
जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल २९ कोटी ५० लाखांचा आराखडा पाठविला. एप्रिल ते जून या दरम्यान २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अमळनेर तालुक्यात सद्यस्थितीत सर्वाधिक ४१ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यात १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जामनेर तालुक्यात १८ गावांना १३ टँकरव्दारे, भुसावळ - १ टँकर, बोदवड -१, पाचोरा -१, चाळीसगाव - १, पारोळा - ६ टँकर असे एकूण ७७ गावांमध्ये ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.