सलग तिसऱ्या वर्षी वाघूर भरले १०० टक्के : जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वाघूर धरण सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. धरण तयार झाल्यापासून १३ वर्षांत हे धरण सातव्यांदा १०० टक्के भरले आहे. यावर्षी देखील धरण १०० टक्के भरल्यामुळे जळगाव शहराचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, भुसावळ व जामनेर तालुक्यातील सिंचनाला देखील यामुळे मोठा फयदा होणार आहे.
२०१७ व २०१८ मध्ये वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे धरणातील जलसाठा २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे २०१९-२०२० मध्ये उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसांआड पाणी मिळत होते. अनेक ठिकाणी पाणीटंचाई होती; मात्र, सलग तीन वर्षांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सलग तिसऱ्या वर्षी वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. हे धरण भरल्यामुळे आगामी उन्हाळ्यात मात्र जळगावकरांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. वाघूर धरणात दोन वर्षे पुरेल एवढे पाणी त्यात आहे. जिल्ह्यात आजअखेर पर्यंत ९८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची एकूण सरासरी ६३२ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ६०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पावसाची टक्केवारी सप्टेंबर अखेरपर्यंत शंभरी पार करण्याची शक्यता आहे.
सातवेळा १०० टक्के भरले धरण
२००८
२०१०
२०११
२०१५
२०१९
२०२०
२०२१
वाघूर धरण - क्षमता व आजची स्थिती
पाणी क्षमता - २४८.५५ दलघमी
टीएमसी - ८.७७६
पाणी पातळी - २३४.१० मीटर
टक्केवारी १००
एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन
शहराला पाणीपुरवठा होत असलेले वाघूर धरण पूर्ण भरले असल्याने शहराचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, शहरात काही महिन्यात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार असून, नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांमुळे शहराला एका दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. जुन्या जलवाहिन्यांच्या प्रणालीमुळे धरण १०० टक्के जरी भरले तरी एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नव्हते मात्र आता अमृत योजनेमुळे व धरण १०० टक्के भरल्याने शहराला भविष्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.