जळगाव जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 07:55 PM2024-01-31T19:55:39+5:302024-01-31T19:56:22+5:30

ईव्हीएम कोणी हॅक करू शकत नाही

Voting system ready in Jalgaon district; Information of the Chief Electoral Officer of the State | जळगाव जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची माहिती

जळगाव जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची माहिती

भूषण श्रीखंडे/जळगाव: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणांचा आढावा घेतला जात असून, जळगाव जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असून, सध्या मतदारांमध्ये मतदान जनजागृती व तसेच ईव्हीएमबाबत जनजागृती नागरिकांपर्यंत केली जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव जिल्हा दौऱ्यावर बुधवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निवडणूक तयारीबाबत अधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. पुढे बोलताना देशपांडे म्हणाले की, या वर्षी जगातील साठ देशांत निवडणुका होत असून, भारतातील होणाऱ्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या देशात निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा व निवडणूक आयोग काम करत असते. आगामी निवडणुकीची तयारी सुरू असून, राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढीसाठी विशेष जनजागृती मोहीम तसेच ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत केली जाणार आहे.

ईव्हीएम कोणी हॅक करू शकत नाही

मतदानावेळी ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते का, याबाबत पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी ईव्हीएम वायरलेस, इंटरनेट सर्व्हरवर चालणारी यंत्रणा नाही म्हणून ती हॅक होऊ शकत नाही. मशीनमधील चिपमध्ये एकदाच प्रोग्राम फिड करता येतो. छेडछाड केल्यास मशीन बंद पडते. आदी तांत्रिक बाजू त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या.

१७३० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग
जिल्हाधिकारी मतदान यंत्रणेबाबत माहिती देताना म्हणाले की, यंदा जिल्ह्यात १७३० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. तसेच ४० टक्क्यांवरील अपंग, ८० वर्षांवरील वृद्धांना मतदान केंद्रावर येणे शक्य नाही, त्यांना घरीच मतदान करण्याची सुविधा केली आहे. १३५ तृतीयपंथींची मतदान यादीत नोंद झाली आहे.

Web Title: Voting system ready in Jalgaon district; Information of the Chief Electoral Officer of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.