जळगाव : यंदा कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार शहरातील विविध मंडळांतर्फे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, काही मंडळांनी आरास न करता सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, तर काही मंडळांनी लहान आकारात का असेना, विविध धार्मिक क्षेत्रांचा देखावा सादर करून, परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, हे उपक्रम राबविताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विठ्ठल मित्रमंडळ
जळगाव : शहरातील विठ्ठल पेठ मित्रमंडळांचे दरवर्षी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक व धार्मिक देखावे सादर केले जातात. यंदाही या श्रीगणेश मंडळाने देखाव्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी गंगोत्री तीर्थक्षेत्राचा देखावा सादर केला आहे. यामध्ये भगवान शंकर, पार्वती व बाळ गणेशाचे बाल स्वरूप दर्शन दाखविले आहे. माता पार्वती या बाळ गणेशाला पाळण्यावर बसवून झोका देत आहेत, तर भगवान शिवशंकर हे हिमालय पर्वतावर ध्यान करत असल्याचे या देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मंडळातर्फे नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तसेच नागरिकांची सायंकाळच्या आरतीला गर्दी होऊ नये, यासाठी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांना घरपोच आरतीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष मंडळाच्या युवा बिग्रेडिअर फाउंडेशनतर्फे लसीकरण मोहीमही राबविली जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दर्शन नेमाडे व उपाध्यक्ष प्रशांत खडके यांनी सांगितले.
जुने जळगाव बहुउद्देशीय मित्रमंडळ
जळगाव : शहरातील जुने जळगावातील जुने जळगाव बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची आरास न करता, सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. दरवर्षी मंडळातर्फे विविध सामाजिक व धार्मिक देखाव्यांचे आयोजन करण्यात येते. मंडळातर्फे यंदा सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच महिलासांठी मोफत रूबेला लसीकरणाचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. मंडळाचे यंदाचे २१वे वर्ष असून, मंडळातर्फे दरवर्षी विविध संकट काळात सामाजिक उपक्रमही राबविले जातात. यंदा पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीत पूरग्रस्तांना चादरी वाटप करण्यात आल्या, तसेच कोरोना काळात गरजू नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष म्हणून निखिल काळे तर उपाध्यक्ष म्हणून रोहित झोपे हे काम बघत आहेत.