जळगाव जिल्ह्यात टायर फुटल्याने कार पलटी होऊन वरणगावचे शिक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:12 IST2018-05-06T21:12:31+5:302018-05-06T21:12:31+5:30
न्हावी गावानजीक अपघात

जळगाव जिल्ह्यात टायर फुटल्याने कार पलटी होऊन वरणगावचे शिक्षक ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : सावदा येथील लग्न सोहळा आटोपून घराकडे परत जात असताना टायर फुटून कार पलटी झाली व त्यात डोक्याला जबर मार लागल्याने वरणगाव उर्दू हायस्कूलचे शिक्षक सय्यद नूर अली कुदरत अली (वय ५५, रा.न्हावी, ता.यावल) हे ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता न्हावी-फैजपूर रस्त्यावरील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सय्यद नूर अली कुदरत अली हे रविवारी सावदा येथे नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते कारने (क्र.एम.एच.१९ ए.एन.७३०५) न्हावी येथे घरी जात असताना साखर कारखान्याजवळ कारचे टायर फुटले, त्यामुळे कार पलटी झाली. त्यात सय्यद नूर यांच्या डोक्याला जबर मार लागला तर मुलगा सय्यद शोएब, तन्वीर अली व नातेवाईक जुवेद अली हे जखमी झाले. तिघांना जवळच्या खासगी दवाखान्यात नेण्यात आले. सय्यद नूर यांना जास्त मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, जखमी तिघांवर फैजपूर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहे. सय्यद नूर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली आहेत. नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित यावल संस्थेच्या वरणगाव येथील उर्दू हायस्कुलमध्ये ते शिक्षक होते.