प्रचारात उतरलेय अवघे उन्मेष पाटील कुटुंबीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:08 IST2019-04-08T15:07:45+5:302019-04-08T15:08:15+5:30
राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत

प्रचारात उतरलेय अवघे उन्मेष पाटील कुटुंबीय!
जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव : भाजपा-सेना युतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यही प्रचारात उतरले आहेत.
चैत्रातल्या रणरणत्या उन्हातही कुटुंब प्रचारात रंगल्याचे दिसून येत आहे. स्वत: आमदार उन्मेष पाटील, त्यांच्या पत्नी संपदा उन्मेष पाटील, त्यांचे वडिल भैय्यासाहेब पाटील, दाजी प्रशांत वाघ, बहिण योगिनी वाघ यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली आहे. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही गुरुवारपासूनच पाटील कुटुंबाने नियोजनपूर्वक 'प्रचार पायपीट' आरंभिली आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन गेल्या साडेचार वर्षात आमदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत असेचे काम जळगाव लोकसभा मतदार संघात करण्याचे आश्वासन देत आहेत.
उन्मेष पाटील । भाजप
राजकारणाचा कोणताही पुवार्नुभव नसताना वयाच्या ३६व्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणुक जिंकली. गेल्या साडेचार वर्षात केलेली विकासकामे हा त्यांचा 'प्रचार अजेंडा' आहे.
पत्नी । संपदा उन्मेष पाटील
संपदा पाटील यांनी २००७ पासून उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या माध्यमातून त्या महिलांसाठी उपक्रम राबवित आहेत. सध्या त्या सकाळी सात ते रात्री ११ पर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
वडिल । भय्यासाहेब पाटील
दरेगाव येथील प्रगतीशिल शेतकरी अशी भैय्यासाहेब पाटील यांची ओळख आहे. त्यांनी काही वर्ष बेलगंगा साखर कारखान्यात नोकरीही केली. सध्या भैय्यासाहेब ग्रामीण भागात प्रचारात सक्रीय झाले आहेत.
मेहूणे । प्रशांत वाघ
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार नियोजनात उन्मेष पाटील यांचे मेहूणे प्रशांत वाघ यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. लोकसभेच्या रणसंग्रामातही ते नियोजनासाठी मिशन मोडवर असतील.
बहिण । योगिनी वाघ
उन्मेष पाटील यांच्या भगिनी योगिनी प्रशांत वाघ या देखील प्रचारात सहभागी झाल्या आहेत. संपदा पाटील यांच्यासोबत आणि वैयक्तिकही त्यांनी उन्मेष पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे.