कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून संघव्यवस्थापकाच्या उपचारासाठी एक लाखांची मदत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:41 IST2018-11-16T21:39:03+5:302018-11-16T21:41:09+5:30
कुलगुरूंची घोषणा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून संघव्यवस्थापकाच्या उपचारासाठी एक लाखांची मदत जाहीर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या सॉफ्टबॉल संघाचे व्यवस्थापक प्रा.किरण नेहेते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी विद्यापीठातर्फे एक लाख रूपयांची आर्थिक मदत कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केली. विद्यापीठ प्रशासनातर्फे या निर्णयाची अधिकृत माहिती कळविण्यात आली आहे.
‘लोकमत’ने मदतीचा हा मुद्दा लावून धरला होता, तर जैन स्पोर्टस् अॅकेडमीच्या माध्यमातून विविध क्रीडा संघटनांनी विद्यापीठाकडे मदतीची मागणी केली होती. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीसुद्धा नेहेते यांच्या उपचारांसाठी एक लाखाची मदत जाहीर केली आहे.
प्रा.नेहेते यांच्यावर पुणे येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
नेहेते यांची लातूर येथील अ.भा.आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेवेळी प्रकृती बिघडली होती. त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाल्याने सुरूवातीला लातूर येथे आणि नंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. दिनेश पाटील यांनी दिली.