बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:23 IST2020-12-25T14:22:04+5:302020-12-25T14:23:06+5:30

बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले.

Unique welcome of Balu Mama's sheep in Beldarwadi | बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

ठळक मुद्देदोन दिवस पाहुणचारगोडधोड जेवणाने देणार गोड निरोप

चाळीसगाव : मजल दरमल करीत पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात येणा-या बाळूमामांच्या मेंढ्यांविषयी ग्रामीण भागात आपुलकीसह भक्तिभावदेखील पहावयास मिळतो. या मेंढ्या साधारण डिसेंबरच्या पूर्वाधात चरण्यासाठी दाखल होत असतात. तीन ते चार महिने त्यांचा गावोगावी मुक्काम असतो. गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले. ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचे वेशीवरच स्वागत केले. 
पाठीवर संसाराचे बि-हाड आणि सोबतीला मेंढ्यांचा तांडा. धनगर बांधवांचे जीवन असे भटकंतीवर असते. मजल दरमजल करीत या मेंढ्या राज्यभर चरण्यासाठी भ्रमंती करीत असतात. विशेषतः ग्रामीण भागात बाळूमामांच्या यामेंढ्याविषयी गावक-यांना ममत्व असते. यामुळेच मेंढ्या गावात आल्या की, त्यांचे वेशीवरच आबाल- वृद्धांसह स्वागत केले जाते. 
 
सिद्धेश्वर आश्रमात मुक्काम आणि पाहुणचार
गुरुवारी दुपारी दोन वाजता बेलदारवाडीत बाळू मामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांच्या सात वाड्यांचे आगमन झाले. दोन हजाराहून अधिक मेंढ्या आणि त्यांच्यासोबत असणारे २०० धनगर बांधव यांना येथील सिद्धेश्वर आश्रमात दोन दिवसीय मुक्कामात पाहुणाचार दिला जाणार आहे. आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील निवृत्तीनाथ महाराज तरुण मंडळाचा यात सक्रीय सहभाग आहे.
मेंढ्यासाठी दिले बागायती कपाशीचे शेत
संभाजी केशरलाल कुमावत यांनी आपले दोन एकर बागायती कपाशीचे शेत बाळू मामांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी उपलब्ध करुन दिले. आपल्या शेताला बाळू मामांच्या मेंढ्यांचे पाय लागले. याचे मोठे समाधान असून म्हणूनच त्यांना चरण्यासाठी हिरव्यागार कपाशीचे शेत दिले. अशी आनंदी प्रतिक्रिया संभाजी कुमावत यांनी व्यक्त केली.
आज एकादशीचे फराळ, शनिवारी गोड शिरा
गुरुवारी रात्री आठ वाजता सिद्धेश्वर आश्रमात आरती झाल्यानंतर  मेंढ्यांसोबत आलेल्या धनगर बांधवांना आमटी, भाकरी आणि भात असे जेवण दिले गेले. पंचक्रोशीतील पाचशेहून अधिक भाविकांचीही उपस्थिती होती.  आज शुक्रवारी एकादशी असल्याने साबुदाणा खिचडी, केळी तर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी दिली जाईल. शनिवारी बाळूमामांसह  मेंढ्यांनाही निरोप दिला जाणार असून आठशे भाविकांना देखील  वरण - भट्टी व गुळाचा गोड शिरा असा खान्देशी मेनू असणार आहे. अशी माहिती भाऊलाल कुमावत यांनी 'लोकमत'ला दिली. यशस्वीतेसाठी गोरख कुमावत, जितेंद्र कुमावत, प्रकाश कुमावत आदिंसह ग्रामस्थ मंडळी सहकार्य करीत आहे.
 

Web Title: Unique welcome of Balu Mama's sheep in Beldarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.