शिव कॉलनीत अंडरपासला अजूनही मंजुरी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:02+5:302021-07-28T04:17:02+5:30
जळगाव : महामार्गावरील सर्वात धोकादायक चौक आणि अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांच्या दप्तरात शिव कॉलनी चौकाची नोंद आहे. ...

शिव कॉलनीत अंडरपासला अजूनही मंजुरी नाही
जळगाव : महामार्गावरील सर्वात धोकादायक चौक आणि अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांच्या दप्तरात शिव कॉलनी चौकाची नोंद आहे. गणेश कॉलनीतून शिव कॉलनीत जाताना महामार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना अनेक वेळा येथे अपघात होत असतात. असे असले तरी या चौकात अंडरपासला चौपदरीकरणाच्या आराखड्यात घेण्यात आले नव्हते. नंतर चेंज ऑफ स्कोपच्या रकमेतून या चौकात अंडरपास तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यालाही जवळपास दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
शिव कॉलनीत महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा करून देण्यात आलेली नाही. तसेच एका बाजूने पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्यामुळे तेथून उतारावरून वेगाने वाहने येतात आणि त्यांना थांबविण्यासाठी शिव कॉलनी चौकात कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. सायंकाळच्या वेळी रस्ता ओलांडताना भल्याभल्यांना घाम फुटतो. असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाला मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे आजही येथे अपघाताची भीती कायम आहे.
काय आहे ब्लॅक स्पॉट
शिव कॉलनी चौकाला पोलिसांनी रस्ते अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहे. ज्या भागात ५०० मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत असतात, तेथे ब्लॅक स्पॉट पोलिसांकडूनच जाहीर केला जातो.
शिव कॉलनीत अंडरपास करण्याच्या आधी रेल्वेच्या वर एक ओव्हर ब्रीज बांधावा लागेल. कामाच्या या टप्प्यात गिरणा नदीवरील बांभोरीजवळचा पूल, तसेच पिंप्राळा येथील रेल्वेवरील पूल वगळण्यात आला होता. आधी हा पूल करावा लागेल नंतर शिव कॉलनीत अंडरपास करता येणार आहे.
शिव कॉलनीवासीयांनी २०२० मध्ये खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही शिव कॉलनीजवळ भुयारी मार्गासाठी प्रयत्न सुरू केले. जनतेला आश्वस्तदेखील केले. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतर एक प्रस्ताव तयार करून नागपूरला महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांकडे पाठविण्यात आला. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
कोट -
जोपर्यंत रेल्वेवरील पूल होत नाही. तोपर्यंत शिव कॉलनीत अंडरपास तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नाही. डीपीआरमध्येच रेल्वे पूल वगळण्यात आला होता. आधी हा पूल करणे गरजेचे आहे
- तुषार तोतला, स्थापत्य अभियंता