दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:15 IST2025-03-10T20:14:52+5:302025-03-10T20:15:13+5:30

वरणगाव-बोदवड मार्गावरील अपघात

Two wheeler Accident one dead Ax | दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन गंभीर

दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन गंभीर

Bike Accident: वरणगावहून आचेगावकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने आचेगाव येथील शरद भास्कर पाटील (७०) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिराचे पुढे काही अंतरावर घडली. शरद पाटील (वय ७०, रा. आंचेगाव) हे दुचाकीने (एमएच १९/ एएस ६९९१) आचेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी (एमएच २८/बीएस ९१४१) धडक झाली. या अपघातात चालक शेख गनी शेख मौलाना (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५) दोघे रा. बोदवड यांचे सह शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद पाटील यांना मयत घोषित केले.
 
इतर दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामधे पाठविण्यात आले. दरम्यान, येथे दुपारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रुग्णालयामधे भेट देऊन माहिती घेतली. या बाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार श्रावण जवरे पुढील तपास करीत आहे.
 
डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप
वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर उशिरा आल्याचा आरोप शरद पाटील यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वेळेवर उपचार मिळाले असते, तर शरद पाटील यांचा मृत्यू टळू शकला असता, असे मयताचा पुतण्या नरेंद्र चंद्रकांत पाटील व इतरांनी सांगितले.

मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. फोन आल्यानंतर रुग्णालयात पोहोचलो असता जखमीची परिस्थिती गंभीर होती. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने ऑक्सिजनसुद्धा लावू शकत नव्हतो. त्यामुळे नातलगांनी केलेला आरोप चुकीचा आहे.
डॉ. सचिन अहिरे, वैद्यकीय अधिकारी, वरणगाव

Web Title: Two wheeler Accident one dead Ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात