जळगाव: सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा होत असताना, जळगाव शहर व तालुक्यातील कुसुंबा येथील दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यशवंत नगरातील लक्षीत राजेंद्र वाघुळदे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह कुसुंबा येथील महेश ज्ञानेश्वर पाटील या दोघांनी गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सुट्टीमुळे आला घरीयशवंत नगरातील लक्षीत वाघुळदे हा तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर त्याचे वडील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक आहे. सध्या सुट्टी असल्यामुळे लक्षीत हा काही दिवसांपूर्वी घरी आला होता. रविवारी तो घरातील वरच्या मजल्यावर एकटाच असताना त्याने गळफास घेतला. त्याचे कुटुंबीय त्याला बोलविण्यासाठी गेले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
नवीन दोरी आणून संपवले जीवनआत्महत्या करण्यासाठी घरात दोरी न मिळाल्याने लक्षीत याने नवीन दोरी आणली. त्यानंतर घरातील पंख्याजवळील कडीला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असून, ती अमेरिकेत राहते.
खापर घ्यायला गेल्या अन् दिसला मुलाचा मृतदेहमहेश पाटील एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला होता. घरासमोर असलेल्या त्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतला. पुरण पोळी करायचे खापर घेण्यासाठी त्याची आई त्या शेडमध्ये गेली, त्यावेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. महेशच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.