शिक्षिकेच्या घरातून लांबविले सव्वा दोन लाखाचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:19 IST2019-06-17T13:19:01+5:302019-06-17T13:19:52+5:30
अनुराग स्टेट बॅँक कॉलनीतील घटना : चार संशयित ताब्यात

शिक्षिकेच्या घरातून लांबविले सव्वा दोन लाखाचे दागिने
जळगाव : महाबळ परिसरातील अनुराग स्टेट बॅक कॉलनीतील परीस हाईटस्मध्ये राहणाऱ्या स्मिता राजेश शिंदे यांच्या घरातून २ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयित म्हणून पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.
परीस हाईटस्मध्ये राजेश भास्कर शिंदे हे पत्नी, मुलगी व मुलांसह वास्तव्यास आहेत. शिंदे रेमंड कंपनीत नोकरीला तर त्यांची पत्नी स्मिता या सेंट जोसेफ विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी आहेत. दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. शिंदे यांनी वर्षभरापासून घर कामासाठी पल्लवी पद्माकर चव्हाण (रा. वंजारी टेकडी, समता नगर) यांच्यासह त्यांच्या मुलींना कामावर ठेवले आहे. दरम्यान, त्यांना पो.कॉ.शरद पाटील व सहकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वटसावित्रीच्या पूजेच्या तयारीदरम्यान प्रकार उघड
स्मिता शिंदे यांनी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता १ लाख २० हजार रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाच्या ६ सोन्याच्या बांगड्या,१ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पेन्डल असे एकूण २ लाख २० हजार रुपयांचे दागिने घरातील दिवाणमध्ये ठेवले होते. रविवारी वटसावित्री पोर्णिमा असल्याने स्मिता या पुजेची तयारी करीत होत्या तर पती सकाळी ७ वाजता ड्युटीवर निघून गेले. पूजेसाठी जायचे असल्याने त्या दिवाणमध्ये ठेवलेले दागिने घेण्यास गेल्या असत्या त्यांना डब्यातील दागिने सापडले नाहीत, डबा रिकामा होता. त्यांनी पती शिंदे यांना प्रकाराबाबत माहिती दिली. ते ११.३० वाजता घरी पोहचले. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्राथमिक चौकशीवरुन एक महिला, तिचा पती व दोन मुली असे चौघांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.