खड्डे चुकवताना दुचाकीची धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:53 IST2021-02-16T22:53:48+5:302021-02-16T22:53:48+5:30
खड्डे चुकवताना दुचाकीस्वार वळणावरील एसटी बसची धडक बसून मोटारसायकल चालक युवक ठार तर दोन जण गंभीर झाले.

खड्डे चुकवताना दुचाकीची धडक, एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : खड्डे चुकवताना दुचाकीस्वार वळणावरील एसटी बसची धडक बसून मोटारसायकल चालक युवक ठार तर दोन जण गंभीर झाले. रावेर- अजंदे रस्त्यावरील दुर्घटना नागझिरी नाल्याचे पुढील वळण रस्त्यावर मंगळवारी सकाळी ७.५० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर अजंदे मार्गे मुक्ताईनगर बसचालकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील १५ पपई मजूर कामगारांचा ट्रक अपघातात सोमवारी बळी गेल्याचे घटनेला दिवस उजडतो न उजडतो तोच आज शहरालगतच्या नवीन विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या अजंदा रस्त्याने धामोडीहून रावेरकडे येणारे मोटारसायकलस्वार रस्त्यावरील मोठ मोठी खड्डे चुकवत असतांना त्यांना रावेर आगारातून सकाळी ७:४० वाजता सुटलेल्या अजंदे मार्गे रावेर - मुक्ताईनगर एस टी बस रावेरकडून अजंद्याकडे जात असताना समोरून धडक बसली. त्यात धामोडी येथील मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या विठ्ठल बाळू पाटील (वय २३) (मूळ रा.मोहराळे, ता.यावल) याच्या डोळ्याला, मेंदूला व हातापायांना तर मोटारसायकलवर लिफ्ट मागून आलेल्या धामोडी हायस्कूलचे शिपाई गोकुळ बाबूराव पाटील (वय ५५) व माजी आमदार अरूण पाटील यांचे स्वीय सहाय्यक रमेश पाटील यांचा मुलगा सचिन रमेश पाटील (वय १२) या दोघांना मेंदूस व पायाला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, बसवाहक सागर तायडे यांनी १०८ रूग्णवाहिकेला दूरध्वनीवर तातडीने संपर्क साधून पाचारण केले असता त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी. महाजन यांनी तातडीने औषधोपचार करून पुढील अत्यावश्यक उपचारासाठी जळगावला हलवले असता विठ्ठल बाळू पाटील (वय २३) (मूळ रा.मोहराळे) या एम.एस.स्सी.चे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या युवकाचा करूण अंत झाला. त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, तर गंभीर अत्यावस्थेतील धामोडी हायस्कूलचे शिपाई गोकुळ बाबूराव पाटील (वय ५५) व माजी आमदार अरूण पाटील यांचे स्वीय सहाय्यक रमेश पाटील यांचा मुलगा सचिन रमेश पाटील (वय १२) या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही औरंगाबाद येथे हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.