राज्यात आता कुठेही बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:12 IST2020-08-20T12:12:36+5:302020-08-20T12:12:47+5:30
भाडेवाढ नाही : पाच हजार फेऱ्यांचे वेळापत्रक तयार

राज्यात आता कुठेही बसने प्रवास
जळगाव : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. महामंडळाची सेवा गुरूवार पासून पुन्हा सुरू होत आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात कुठल्याही जिल्ह्यात प्रवाशांना जाता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून एस. टी. महामंडळाची बससेवादेखील बंद होती. यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे सव्वाशें कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. दोन-दोन महिने विलंबाने पगार होत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता महामंडळाने २१ मे पासून जिल्हातंर्गंत बससेवेला परवानगी दिली होती.
बसेस सोडण्यापूर्वी बसेस व संपूर्ण बसस्थानक सॅनिटाईजर करून सोडण्याच्या सुचनाही विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत.
कोरोनामुळे एका बाकावर एकच प्रवासी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सुचनेनुसार बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसेल. ५० आसनी बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश असेल. प्रवेश देतांना प्रवाशाने तोंडाला मास लावणे बंधनकारक असून, सोशल डिस्टनिंगचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासामध्ये लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना प्रवेश देण्यात येणार असून, पूर्वीप्रमाणे सर्वांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
कुठलीही भाडेवाढ नाही
गुरुवार पासून सुरू होणाºया बससेवेमध्ये कुठलिही भाडेवाढ नसून, एसटीची साधी बस, निमआराम, शिवशाही व रातराणी बसचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. प्रवाशांना प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची आवश्यकता नसून, बसमध्ये थेट तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. जिल्हाभरात डेपोंमधून दररोज एकूण पाच हजार फेºयांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यातून प्रवाशांच्या संख्येनुसार टप्प्या-टप्प्याने फेºया वाढविण्याचे नियोजन महामंडळाच्या जळगाव विभागाने केले आहे.
गुरूवारपासून तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी सकाळी सात वाजता बसेस सुटतील. परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्याच्या ठिकाणहून सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहतील. परजिल्ह्यात जाण्यासाठी प्रवासी उपलब्ध झाले, तर त्यांच्यासाठींही बस सोडण्यात येईल.
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव