जगात 'उजव्यां'चा बोलबाला, तरीही 'डावे' ठरतात 'उजवे'!
By अजय पाटील | Updated: August 13, 2025 10:00 IST2025-08-13T10:00:43+5:302025-08-13T10:00:52+5:30
आज जागतिक डावखुरा दिन; डाव्यांनी सिद्ध केली प्रतिभा

जगात 'उजव्यां'चा बोलबाला, तरीही 'डावे' ठरतात 'उजवे'!
अजय पाटील
जळगाव : जगात सुमारे १० ते १२ टक्के लोकसंख्या डावखुरी आहे, पण उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या जगात त्यांना अनेकदा अनोख्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, डावखुरे असण्याचे काही खास फायदेही आहेत. डावखुरे असणे ही उणीव नसून ती वेगळी क्षमता असल्याने या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात सिद्ध केले आहे.
डाव्या हाताच्या व्यक्तींचे वेगळेपण साजरे करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस' साजरा केला जातो.
'डावखुऱ्या'साठी काही वस्तू अजूनही 'उजव्या'
डावखुऱ्या व्यक्तींना लहानपणापासूनच अनेक वस्तू आणि उपकरणे वापरताना जुळवून घ्यावे लागते, कारण ती प्रामुख्याने उजव्या हाताच्या सोयीनुसार डिझाइन केलेली असतात. संगणकाचा माऊस उजव्या हातासाठी तयार केला असतो.
डावखुऱ्यांना तो डाव्या हाताने वापरण्यासाठी त्या पद्धतीची मांडणी करावी लागते. शाईचे पेन वापरतानाही अडचणी येतात, दरवाज्याचे हँडल, एटीएममधील स्वाईप मशीन, तसेच काही सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या जागाही उजव्या हाताच्या सोयीनुसार असतात.
लोक डावखुरे का असतात? कशामुळे ठरते डावे-उजवे ?
मानवी मेंदूचे डावे आणि उजवे असे दोन भाग आहेत. मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रित करतो, तर उजवा भाग डाव्या बाजूला. डावखुऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक सक्रिय असतो, डावखुरे असण्यामागे अनुवांशिकतेचा महत्त्वाचा वाटा असतो.
डावखुरे असणे हे विशेष प्रतिभेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. जगभरात अनेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आणि नेते डावखुरे आहेत. साहेबराव पाटील, माजी आमदार, पारोळा-एरंडोल.
डावखुऱ्या व्यक्तींना लहानपणापासूनच जुळवून घ्यावे लागते, पण त्यामुळेच ते अधिक कणखर बनतात. मी डावखुरा असल्याने, याचा अनुभव घेतला आहे. डावखुरेपणा ही उणीव बिलकुल नाही- जयकुमार रावल, राजशिष्टाचार मंत्री