हरिविठ्ठल नगरातून ट्रक्टरसह ट्रॉली चोरणा-या तिघांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:20 IST2020-09-25T21:19:53+5:302020-09-25T21:20:04+5:30
एलसीबीची कारवाई : ट्रॅक्टरसह ट्रॉली हस्तगत

हरिविठ्ठल नगरातून ट्रक्टरसह ट्रॉली चोरणा-या तिघांच्या आवळल्या मुसक्या
जळगाव : हरीविठ्ठल नगरातील रहिवासी संदीप हटकर यांचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून अरबाज दाऊत पिंजारी (२३), जितेंद्र सुभाष पवार (३६, दोन्ही, रा. हरिविठ्ठलनगर) व ईजाज खान मोहम्मद खान (२६, रा. मालेगाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांच्या ताब्यातून चोरी केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी संदिप सुभाष हटकर हे शेती करतात. त्यांच्याकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर (क्र.एमएच १८ झेड ३४३६) असून ते आजोबाच्या नावे आहे. दरम्यान, त्यांची आई आजारी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होत्या. त्यामुळे शेतीचे काम बंद असल्यामुळे ट्रॅक्टर घरीच होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संदीप हा दवाखान्यातून घरी आला असता त्यास १ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ट्रक्टरसह ट्रॉली दिसून आले नाही. त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी आटोपल्यानंतर ट्रॅक्टरसह ट्रॉलीचा शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासून बघितले मात्र काहीही मिळून आले नाही. अखेर ट्रॅक्टर न मिळून आल्याने संदीप यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा शोध घेवून केली अटक
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी एक पथक तयार करून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने अरबाज पिंजारी, जितेंद्र पवार आणि ईजाज खान यांना अटक केली आहे. ही कारवाई जितेंद्र पाटील, सुधाकर आभोरे, रामकृष्ण पाटील, संजय सपकाळे, अशरफ शेख इंद्रिस पठाण यांनी केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांजवळून ट्रॅक्टर व ट्रॉली हस्तगत करण्यात आलेले आहे.