जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण
By विलास बारी | Updated: October 29, 2023 21:53 IST2023-10-29T21:52:53+5:302023-10-29T21:53:12+5:30
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण
जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर वाहन लावण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. नारळ विक्रेत्याने थेट कोयत्याने वार केल्याने एका जणाला जखम झाली. या ठिकाणी आलेल्या एका महिलेनेदेखील मी पोलिस आहे, असे म्हणत डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नीरज चौधरी हे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पांडे चौक परिसरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५६२८) आले होते. ही कार त्यांनी रुग्णालयासमोर उभी केली व ते मध्ये जात असताना एक जण तेथे आला व या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या. दुसरीकडे जागा नसल्याचे सांगून डॉ. चौधरी हे रुग्णालयात निघून गेले. काही वेळाने एका कर्मचाऱ्याने हातगाडीवाला इसम तुमच्या गाडीची तोडफोड करीत आहे. त्या ठिकाणी त्यांनी येऊन पाहिले असता त्या वेळी दोन जण त्यांच्या अंगावर धावून आले व त्यांची कॉलर पकडली. डॉक्टरांचे दोघे सरकारी तेथे आले असता त्यांनादेखील मारहाण केली. त्यातील एकाने नारळाच्या गाडीवरून कोयता आणून दांगोडे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हाताला जखम झाली.
हा वाद सुरू असताना तेथे एक महिलादेखील आली व नारळाची गाडी का लावू देत नाही, असे म्हणत मारहाण करू लागली. शिवाय मी पोलिस आहे, तुला काय करायचे कर अशी धमकी दिली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस तेथे पोहचले असता त्यांच्याशीही वाद घालून दोघे जण पळून गेले. यामध्ये डॉ. चौधरी यांच्या कारचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी डॉ. नीरज चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अर्जुन राठोड, सोनू चव्हाण, शिल्पा राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.