गणपती नगरात ७५ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 21:29 IST2019-12-02T21:28:59+5:302019-12-02T21:29:10+5:30
गुन्हा दाखल : सोन्याचे दागिने लांबविले

गणपती नगरात ७५ हजाराची घरफोडी
जळगाव : धुळे येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्या राहूल जगदे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कापडी पिशवीत ठेवलेली ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल जगदे हे २० नोव्हेंबर रोजी ते धुळे येथे कुटूंबासह नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत सोन्याची ७५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. १ डिसेंबर रोजी जगदे हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा तिसेच कुलुप देखील तुटलेले दिसुन आले. घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त होता. बेडरूम मधील कपाट देखील उघडे होते.बेडरूम मधील भिंतीच्या हुकाला लटकविलेल्या कापडी पिशवीत ठेवलेली सोन्याची पोत आढळून आली नाही. या घटनेची माहिती त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहेत.