जळगाव शहरात उकाड्यामुळे दरवाजा उघडा ठेवल्याने चोरट्यांनी साधली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 16:01 IST2018-04-01T16:01:23+5:302018-04-01T16:01:23+5:30
रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेऊन झोपणे गजानन भिका लोहार (वय ४३, रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव) यांना चांगलेच महागात पडले आहे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ हजार रुपये ठेवलेली पर्स लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

जळगाव शहरात उकाड्यामुळे दरवाजा उघडा ठेवल्याने चोरट्यांनी साधली संधी
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१ : रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेऊन झोपणे गजानन भिका लोहार (वय ४३, रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव) यांना चांगलेच महागात पडले आहे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ हजार रुपये ठेवलेली पर्स लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी नगरातील हुडकोमधील ज्ञानेश्वरी बिल्डींगमध्ये गजानन भिका लोहार हे पत्नी, आई व मुलांसह वास्तव्याला आहेत. तर भाऊ प्रवीण लोहार हे देखील समोरच राहतात. शनिवारी गजानन यांनी भाऊ व त्याच्या परिवाराला घरी जेवायला बोलावले होते. जेवण झाल्यानंतर भाऊ रात्री साडे दहा वाजता त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर मुख्य दरवाजा बंद करुन हवा येण्यासाठी अन्य दोन दरवाजे उघडे ठेवून घरातील सर्व जण झोपून गेले.
मुलाने मोबाईल मागितल्यावर उघड झाली घटना
सकाळी साडे सहा वाजता उठल्यावर मुलगा मयुर याने खेळण्यासाठी मोबाईल मागितला असता जागेवर मोबाईल नव्हता. काचेच्या शोकेसवर हा मोबाईल चार्जिंगला लावलेला होता, त्याशिवाय अन्य दोन मोबाईलही ठेवलेले होते. त्यापैकी एकही मोबाईल जागेवर नव्हता तर पत्नीची पर्स देखील गायब झालेली होती. या पर्समध्ये तीन हजार रुपये ठेवलेले होते. आठ हजार रुपये किमतीचा एक, दुसरा सहा हजार तर तिसरा पाचशे रुपये किमतीचा असे तीन मोबाईल व रोख रक्कम १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.