जळगाव विभागातून अद्यापही परराज्यात रातराणी बसची सेवा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:52+5:302021-08-01T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सध्या राज्यांतर्गत मुंबई, पुणे या ठिकाणी रातराणी सेवा सुरू आहे. ...

जळगाव विभागातून अद्यापही परराज्यात रातराणी बसची सेवा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे सध्या राज्यांतर्गत मुंबई, पुणे या ठिकाणी रातराणी सेवा सुरू आहे. मात्र, जिल्हाभरातील आगारातून अद्याप कुठल्या राज्यात रातराणी बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अहमदाबाद, वापी, बडोदा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेने जावे लागत आहे. त्यामुळे महामंडळाने या संबंधित मार्गावरही रातराणी बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी महामंडळातर्फे टप्प्या-टप्प्याने सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये परराज्यातील सुरत, बडोदा, वापी, इंदूर या ठिकाणी दिवसा बस सोडल्या जात आहेत. तर राज्यांतर्गत फक्त मुंबई व पुणे या ठिकाणीच रातराणी बस सुरू आहेत; परंतु परराज्यात एकही ठिकाणी रातराणी सेवा नाही. त्यामुळे जळगाव विभागातील प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेने सुरत, अहमदाबाद या ठिकाणी जावे लागत आहे. महामंडळातर्फे सुरुवातीपासूनच रातराणीची सेवा फक्त मुंबई व पुणे या ठिकाणी सुरू आहे. प्रवाशांकडून सुरुवातीपासूनच या मार्गावर मागणी असल्यामुळे व त्यानुसार प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुंबई व पुणे या मार्गावर रातराणी सेवा सुरू आहे. मात्र, परराज्यात रातराणी सुरू करण्याबाबत प्रवाशांकडून मागणी नसल्यामुळे, या मार्गावर सुरू करण्यात आले नसल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी
जळगाव ते पुणे
जळगाव ते ठाणे
जळगाव ते मुंबई सेंट्रल
इन्फो :
परराज्यात अद्यापही या मार्गावर रातराणी सेवा नाही
जळगाव ते अहमदाबाद
जळगाव ते बडोदा
जळगाव ते सुरत
जळगाव ते इंदूर
जळगाव ते सेल्वास
इन्फो :
परराज्यात सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
जळगावहून सुरतला जाण्यासाठी महामंडळातर्फे रातराणीची बससेवा नसल्यामुळे, रेल्वेनेच सुरतला जावे लागते. विशेष म्हणजे जळगावातून सुरतला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निदान सुरतसाठी तरी रातराणी सेवा सुरू केली, तर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
सुरेश पाटील, प्रवासी
व्यवसायाच्या कामानिमित्त अधूनमधून अहमदाबादला जाणे सुरूच असते. महामंडळाची जळगावातून रात्रीच्या वेळी कुठलीही बस सुविधा नसल्यामुळे रेल्वेने किंवा ट्रॅव्हल्सने जात असतो. त्यामुळे महामंडळाने अहमदाबादसाठी रात्रीच्या वेळी बससेवा सुरू करण्याची गरज आहे.
सुनील वाणी, प्रवासी
इन्फो :
महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे कुठल्याही आगारातून पर राज्यात रातराणीची सेवा सुरू नाही. लवकरच अहमदाबादसाठी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांची मागणी नसल्यामुळे इतर राज्यात रातराणी सेवा सुरू झालेली नाही, मागणी असली की सेवा करण्यात येईल.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी