मनोकामना पूर्ण करणारे तरसोदचे गणपती मंदिर, दर्शनाला यायचे पेशवा अन् मराठा सरदार
By अमित महाबळ | Updated: September 1, 2022 15:58 IST2022-09-01T15:58:10+5:302022-09-01T15:58:38+5:30
तरसोद, नशिराबाद व मुरारखेडा (उजाळगाव) या तीन गावांच्या सीमेसमोर तरसोद शिवारात पुरातन गणपती मंदिर आहे.

मनोकामना पूर्ण करणारे तरसोदचे गणपती मंदिर, दर्शनाला यायचे पेशवा अन् मराठा सरदार
जळगाव: तालुक्यातील तरसोद येथील गणपती मंदिराचा परिसर सिद्ध पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून, इतिहास काळात उत्तरेतील मुलुखगिरी यशस्वी होण्यासाठी पेशवा आणि मराठा सरदार या मंदिरात येऊन मनोकामना करत असत, अशी माहिती सांगितली जाते.
तरसोद, नशिराबाद व मुरारखेडा (उजाळगाव) या तीन गावांच्या सीमेसमोर तरसोद शिवारात पुरातन गणपती मंदिर आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून याची ओळख आहे. स्टेट बोर्ड फॉर हिस्टोरिकल रेकॉर्ड अॅन्ड एन्शंट मॉन्यूमेंट्सचे सदस्य, इतिहास संशोधक द. ग. काळे यांनी ९ मार्च १९५८ रोजी, तरसोद ग्राम पंचायतीच्या अभ्यागत पुस्तकात गणपतीचे मंदिर पुरातन असल्याची नोंद केली आहे. हे मंदिर इ. स. १६६२ मध्ये मुरारखेडे येथील मोरेश्वर हणमंत देशमुख यांनी बांधले आहे.
या सिद्ध पुरुषांचा पदस्पर्श -
पद्मालयचे सिद्ध पुरुष गोविंद बर्वे महाराज, आळंदी देवाची येथील नरसिंह सरस्वती महाराज, नशिराबादचे झिपरुअण्णा महाराज मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे. शेगावचे गजानन महाराज हे झिपरुअण्णा महाराजांना भेटायला यायचे तेव्हा ते दोघेही मंदिरात येत असत. जप-तप, होमहवन, अथर्वशिर्षाची सहस्त्र आवर्तने आणि सिद्ध पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मंदिरासमोर वड, चिंचेची मोठी जुनी झाडे आहेत. मंदिरामागे पायविहीर पायऱ्या बुजलेल्या स्थितीत आहे.
नाल्यात वाहून गेला होता हत्ती -
पेशवे व मराठा सरदारांच्या फौजा उत्तरेत मुलुखगिरी करण्यासाठी जात असत तेव्हा त्या मुरारखेडा-तरसोद परिसरात थांबायच्या. मुलुखगिरी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पेशवे व मराठे सरदार हे सुद्धा मंदिरात दर्शनासाठी यायचे. मंदिरासमोरील नाल्यामध्ये आलेल्या पुरात एकदा त्यांचा हत्ती वाहून गेल्यामुळे या नाल्यास हातेड नाला नाव पडले, अशी माहिती सांगितली जाते. दरवर्षी कार्तिक शुध्द त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. माघ शुद्ध तिलकुंद चतुर्थीस जन्म दिवस साजरा करण्यात येतो.
ट्रस्टची स्थापना -
सन १९८० साली ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर पुना उखा अलकरी व त्यांच्या भावांनी ३६ आर शेत जमीन संस्थानास दान दिली. संस्थानने १ हेक्टर ९८ आर शेत जमीन खरेदी केली आहे. आजमितीस एकूण २ हेक्टर ३४ आर जमीन संस्थानच्या मालकीची आहे.
पुराला थोपविण्यासाठी बांधला धक्का -
हातेड नाल्याच्या पुरापासून मंदिराचा बचाव व्हावा म्हणून लांब व उंच धक्का बांधण्यात आला आहे. मुळ पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार करून मोठा ओटा बांधण्यात आला असून, मंदिराचे प्रांगण फरसबंद केले आहे. समोर शिवपंचायतन महादेव, मारुती व एकविरादेवी मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, भक्तांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्यावर पुरातन शिल्प पद्धतीचे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. निवृत्त तहसीलदार मोतीराम भिरुड (रा. चिनावल) यांनी आपली पत्नी सुशिला यांच्या स्मरणार्थ ५०x३० फुटांचे सभागृह बांधून दिले आहे.