शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 08:17 IST2025-12-16T08:10:45+5:302025-12-16T08:17:53+5:30
हे कोटिंग शत्रूवर तुटून पडणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांसाठी 'कवच' ठरणार आहे.

शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
जळगाव : भारतीय लढाऊ विमानांसाठी शत्रूच्या रडारना चकवा देण्याची क्षमता असलेले एक कोटिंग शोधून काढण्याची किमया जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 'युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (यूआयसीटी) मधील 'शिल्ड टेक' या विद्यार्थ्यांच्या संघाने केली आहे. हे कोटिंग शत्रूवर तुटून पडणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांसाठी 'कवच' ठरणार आहे. स्थानिक लॅबमध्ये केलेल्या संशोधनातून या कोटिंगची निर्मिती केली आहे. या संशोधनाला 'स्मार्ट इंडिया हॅकाथॉन-२०२५' मध्ये अखिल भारतीय स्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेअंतर्गत केलेल्या या संशोधनाला १.५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
असे आहे संशोधन
कोटिंग तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चार महिने संशोधन केले. फाइटर जेट बांधणीत जे कंपोझिट मटेरियल वापरले जाते, त्याच्यासारख्या साहित्यावर कोटिंग लावून त्याची प्राथमिक चाचणी विद्यापीठात करण्यात आली. याचे निकाल पॉझिटिव्ह आले. हे प्राथमिक स्वरूपाचे संशोधन असून, कोटिंग तयार करण्यासाठी वापरलेले सर्व घटक भारतातच उपलब्ध आहेत. या पुढील टप्प्यात विमान बनवण्यासाठी जे वरीलप्रमाणे साहित्य वापरले जाते, प्रत्यक्ष त्यावरच विद्यार्थ्यांनी तयार केलेले कोटिंग लावून डीआरडीओमध्ये पुढील रडार व इतर चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रा. डॉ तुषार देशपांडे यांनी दिली
"आविष्कार, नैपुण्य, बुद्धिमत्ता याकरिता ग्रामीण किंवा शहरी भाग अशा कुठलाही सीमारेषा नसतात. विद्यार्थ्यांनी संशोधनातून खानदेशचा व विद्यापीठावा गौरव अधोरेखित केला आहे." - प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलगुरू, बहिणाबाई विद्यापीठ
"या कोटिंगमध्ये अधिक संशोधन केले जाणार असून त्याच्या पेटंटसाठी प्रयत्न केले जाणार आहेत."- दीपांशू रहांगडाले, टीम लीडर, शिल्ड टेक
'शिल्ड टेक'मध्ये दीपांशू रहांगडाले, नेत्रदीप कदम, चैतन्य सातपुते, प्राजक्ता लंके, भार्गव रायकर आणि साहिल झांबरे यांचा आहे. त्यांच्या 'एन-फॅन्टम: संरक्षणासाठी स्टेल्थ कोटिंग' या प्रकल्पाने हे यश मिळवले.