टायर फुटल्यानं समोरुन येणाऱ्या बसला कारने दिली धडक; ३ जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:06 IST2024-10-08T13:05:01+5:302024-10-08T13:06:58+5:30
निजामपूर येथील वाणी कुटुंबाकडून यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्राला दरवर्षी भंडारा असतो.

टायर फुटल्यानं समोरुन येणाऱ्या बसला कारने दिली धडक; ३ जण जागीच ठार
शाम जाधव
चोपडा ( जि.जळगाव) : कारचे दोन टायर फुटून समोरुन येणाऱ्या बसवर आदळल्याने कारमधील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता चोपड्यानजीक घडली. मृतांमध्ये निजामपूर (ता. साक्री ) येथील सख्ख्या भावांचा समावेश आहे. शैलेश श्रीधर वाणी ( ३४ ) नीलेश श्रीधर वाणी ( ३० ) हे दोन सख्खे भाऊ आणि जितेंद्र मुरलीधर भोकरे ( ४७, रा. नाशिक) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
निजामपूर येथील वाणी कुटुंबाकडून यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्राला दरवर्षी भंडारा असतो. त्यासाठी शैलेश वाणी, निलेश वाणी हे दोन भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र भोकरे हे कारने मनुदेवीकडे जात होते. चोपडा तालुक्यातील मजरेहोळ फाट्याजवळ रस्ते खराब असल्याने कारचे मागील एक आणि नंतर पुढचा एक असे दोन टायर फुटल्याने कार समोरून येणाऱ्या एस.टी.बस वर जावून आदळली. यात मागे बसलेले तिनही जण जागीच ठार झाले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.