लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ समोर येत असल्याने यात नेमकी तयारी काय याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यात मोहाडी येथे आणखी एक कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी माहिती घेतली.
मोहाडी रुग्णालयात काय उपाययोजना आहेत, काय करता येतील याबाबत त्यांनी माहिती घेतली. यात सुरूवातीला ५०० बेड हे ऑक्सिजन पाईपलाईनचे करण्यात येणार आहेत. तसेच १०० खाटांचा आयसीयू याठिकाणी राहणार असून त्यातील १५ टक्के बेड हे लहान मुलांसाठी राखीव राहणार आहेत. यासह रावेर व किनगाव येथे इमारतींचे काम सुरू असून त्या ठिकाणी आणखी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तरी जागेची अडचण येणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे राहिले आहे. वीजेचा प्रश्न मार्गी लागणल्यानंतर हे प्लान्ट कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरमुळे चिंता वाढली
अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात १ हजार रुग्ण आढळून आले होते. पश्चिम महाराष्ट्रातही रुग्ण समोर येत आहेत. नगर हा उत्तर महाराष्ट्रात येत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आगामी नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात अद्याप रुग्णवाढ नसली तरी तिसरी लाट ऑगस्टदरम्या येण्याची शक्यता तज्ञ वर्तवित असल्याने आगामी काही दिवसांवर लक्ष राहणार आहे.