धरण, धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:23+5:302021-09-12T04:19:23+5:30
स्टार - ११६७ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव ...

धरण, धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !
स्टार - ११६७
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव जिल्ह्यातील सर्वच धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे धबधबे व ओसंडून वाहणारे धरणे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, धबधबा पाहण्यापेक्षा आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे, मोबाईलवर सेल्फी काढण्याचं फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरंच वाढलं आहे. पण त्यासोबतच दुर्दैवाने सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे़ त्यामुळे पर्यटकांनी संपूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात आणि जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे यावल तालुक्यातील मनुदेवी येथील व चाळीसगावातील पाटणादेवी येथील धबधबाही खळाळून वाहू लागला आहे. दुसरीकडे जळगावातील कांताई धरणातसुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. तर जळगावपासून ६० किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेणी येथील धबधबा खळाळून वाहू लागला आहे. धबधब्याचे हे रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे. धबधब्याचा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असून उंचावरून कोसळणारा धबधबा पाहतानाच तेथे सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना अनावर होत आहे. स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून सेल्फी काढणारे नागरिक येथे पहावयाला मिळत आहेत. वनविभाग, स्थानिक संस्था तसेच पोलिसांकडून होत असलेल्या विरोधाला तसेच सुरक्षेबाबतच्या सूचनांना न जुमानता तरुणाई सेल्फीला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत होते.
पर्यटनाला जा, पण काळजी घ्या
धबधबे, धरण तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याचे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा जिवावर बेतू शकते़ धबधबा खळाळून वाहत असताना त्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. तसेच धरण व तलावांमध्ये पोहणे टाळावे. अनेकजण ज्या भागात मनाई असते, त्या भागात फिरण्यासाठी जातात किंवा पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे ज्या भागात मनाई आहे, अशा ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तरीही जुमानत नाहीत !
मनुदेवी येथील धबधब्याच्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले असून धबधब्याच्या पन्नास ते साठ फूट अंतरावर कंपाऊंड बांधण्यात आले आहे, जेणेकरून कुणालाही धबधब्याकडे जाता येणार नाही. दुसरीकडे पाटणादेवी येथेही धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे. जळगावातील कांताई धरण येथे कर्मचारी नेमण्यात आले आहेत़ मात्र, तरीही सूचनांना न जुमानता नागरिक गर्दी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.