वीज बिल न भरल्यामुळे तहसीलची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST2021-09-18T04:19:09+5:302021-09-18T04:19:09+5:30

चाळीसगाव : अनेक वेळा नोटिसा देऊनही थकीत वीज बिल न भरल्यामुळे अखेर तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी ...

Tehsil lights go out due to non-payment of electricity bill | वीज बिल न भरल्यामुळे तहसीलची बत्ती गुल

वीज बिल न भरल्यामुळे तहसीलची बत्ती गुल

चाळीसगाव : अनेक वेळा नोटिसा देऊनही थकीत वीज बिल न भरल्यामुळे अखेर तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारवाई केली. केवळ वीज बिल वेळीच न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची नामुष्की ओढावली असल्याने त्याची जोरदार चर्चा शहरात दिवसभर होती. दरम्यान, सायंकाळी या कार्यालयाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊन काळापासून ते आजपर्यंत चाळीसगाव तहसील कार्यालयाकडे वीज बिलाची रक्कम एकूण दोन लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी होती. सदरच्या बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने तहसील कार्यालयाला अनेक नोटिसा दिल्या होत्या. तरीही या नोटिशींची दखल घेतली नाही म्हणून केवळ समज म्हणून या कार्यालयाला गुरुवारपर्यंत बिल न भरल्यास एक दिवसासाठी पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस दिली. याचीही दखल न घेतल्याने अखेर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कंपनीच्या पथकाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. यामुळे कार्यालयातील कामकाज इन्व्हर्टरवर जेमतेम संथ गतीने सुरू होते. मात्र, कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे जवळपास येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. नोटीस दिल्यानुसार कंपनीने सायंकाळी वीजपुरवठा सुरू करून दिला.

तहसील कार्यालयाने वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

सर्वसामान्य ग्राहकांच्या घरांवर वीज बिल भरण्यासाठी चकरा मारणाऱ्या, वेळप्रसंगी वीज कनेक्शनदेखील कट करणाऱ्या कंपनीच्या थकबाकीदारांच्या यादीत चाळीसगाव तहसील कार्यालयाचेदेखील नाव होते. या कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे आपले कर्तव्य बजावले असल्याची चर्चा शहरात सर्वत्र होती.

कोट-

थकीत वीज बिलामुळे तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल भरण्याबाबत महावितरण कंपनीला कळविण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता वीजपुरवठा जोडण्यात आला आहे.

-जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार, चाळीसगाव

फोटो ओळी.

१) चाळीसगाव तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयात अशी

परिस्थिती पाहायला मिळाली. (छाया : संजय सोनार, चाळीसगाव)

२) चाळीसगाव तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा तोडताना महावितरणचे कर्मचारी.

Web Title: Tehsil lights go out due to non-payment of electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.