भडगावातील शिक्षक संघटनांचा सर्वेक्षणावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:42+5:302021-08-13T04:19:42+5:30
यापूर्वी कोरोनाकाळात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत टप्पा क्रमांक १ व २चे सर्वेक्षण शिक्षकांनी ...

भडगावातील शिक्षक संघटनांचा सर्वेक्षणावर बहिष्कार
यापूर्वी कोरोनाकाळात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत टप्पा क्रमांक १ व २चे सर्वेक्षण शिक्षकांनी अत्यंत वस्तुनिष्ठ व जबाबदारीपूर्वक पूर्ण केले असून, नुकतीच सर्वेक्षणाच्या टप्पा क्रमांक ३ची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात येत आहे.
सद्यस्थितीत शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमित सुरू झालेले असून, इतर वर्गांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच सेतू अभ्यासक्रमाचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांकडून दर आठवड्याला स्वाध्याय सोडवून घेणे, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाचे बँक खाते उघडणे, सरलअंतर्गत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन करणे इत्यादी कामे सुरू आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत खंड पडू नये म्हणून सर्वेक्षणावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिक्षक सेनेचे टिकाराम पाटील, योगेश चिंचोले, शिक्षक समितीचे मनोज पाटील, शिक्षक संघाचे रावसाहेब पाटील, शिक्षक परिषदेचे सुनील पाटील, अखिल भारतीय शिक्षक संघाचे अविनाश देवरे, पारोळा पतपेढीचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, दिलीप महाजन यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.