कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीच्या उपचारासाठी शिक्षकांची मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:31 IST2021-02-01T15:30:47+5:302021-02-01T15:31:30+5:30
माजी विद्यार्थीनीला कॅन्सर झाल्याचे कळताच शिक्षकांनी तिच्या मदतीसाठी फेरी काढली.

कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीच्या उपचारासाठी शिक्षकांची मदतफेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमसरे, ता. अमळनेर : अठराविश्व दारिद्र्यावर मात करीत तिने दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केले अन डाॅक्टर बनण्याचा संकल्प केला. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशही मिळविला. आॅनलाईन अभ्यासात उच्चांक गाठला. पण उदभवलेल्या आजाराच्या चाचणीत ब्लड कॅन्सरचे निदान होताच पायाखालची जमिनच घसरली. आई-वडिलांच्या आक्रोशाने समस्त गावाला गहिवरून आले. माजी विद्यार्थिनीच्या या दुर्धर आजाराशी झुंज देण्यासाठी कळमसरे हायस्कूलच्या शिक्षकांनी मात्र मदतीसाठी कंबर कसली.
ही चित्तरकथा आहे, मूळ आडगाव, ता. एरंडोल येथील रहिवाशी मात्र आई-वडिलांसमवेत कळमसरे या आजोळच्या गावातच स्थायिक झालेली वंशिका राजेंद्र महाजन या हुशार विद्यार्थिनीची. कळमसरे येथील निवृृृत वायरमन पौलाद शंकर वैराळे (माळी) यांची कन्या अर्चना राजेंद्र महाजन यांची वंशिका ही मुलगी आहे. वंशिका हिने शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे या शाळेतून मार्च २०२० परीक्षेत दहावीत ७५ टक्के गुणांनी विशेष प्राविण्य संपादन करून, प्रताप महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे.
अधूनमधून उदभवणाऱ्या किरकोळ आजाराने ऊग्र रूप धारण केल्यावर डाॅक्टरांनी केलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यात वंशिका हिला रक्ताचा कॅन्सरचे निदान झाले. सासरी जेमतेम परिस्थितीमुळे आई अर्चना आपल्या पतीसह माहेरी कळमसरे गावी रहायला आली. वडील राजेंद्र महाजन खाजगी प्रवासी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. आई मोल-मजुरीने हातभार लावते.
वंशिकाच्या दुर्धर आजाराने संपूर्ण गावच हादरले. शारदा हायस्कूल व कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण सोनवणे, पर्यवेक्षक विलास इंगळे, विकास महाजन व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ वर्गणीतून बारा हजाराची रक्कम जुळवली. गावातील तरूणांनी मदतफेरी काढून, सोशल मिडियावर मदतीचे आवाहन केले. आरोग्यदूत शिवाजी राजपूत मित्र मंडळीने मुंबई टाटा कॅन्सर हाॅस्पिटलला नाव नोंदणी केली व पुढील उपचारासाठी मानवता कॅन्सर हाॅस्पिटल नासिक येथे वंशिका हिला भरती केलेले आहे.