कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:55 PM2020-06-03T17:55:02+5:302020-06-03T17:55:11+5:30

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे : जळगाव येथे कोरोना विषाणूबाबत घेतली आढावा बैठक

 Task force to reduce corona mortality | कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स

कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स

Next

जळगाव: जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री टोपे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करावे
मंत्री टोपे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी तातडीने करावी. तसेच सर्वेक्षण व तपासणी अचूक आणि परिणामकारक करावी.

फिजिशियन व इन्स्टेनिव्ह तज्ज्ञांचा समावेश
कोरोना विषाणूचे मृत्यूदर कमी करण्यासाठी आयएमएच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करावा. त्यात फिजिशियन व इन्स्टेनिव्ह तज्ज्ञांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी जळगाव येथे प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे किमान 24 तासांत रुग्णांचे तपासणी अहवाल मिळालेच पाहिजेत, असे नियोजन करावे, असेही निर्देश मंत्री टोपे यांनी दिले.

हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक निधी, यंत्रसामग्री उपलब्ध करुन दिली आहे. वैद्यकीय, परिचारिकांसह अन्य रिक्त पदे करारावर भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिणामकारक सेवा बजवावी. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याशिवाय शहरातील 50 खाटांचे गोल्ड सीटी व गोदावरी हॉस्पिटलमधील 100 खाटा डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ये- जा होणार नाही याची खबरदारी घ्या
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढणार नाहीत यासाठी कंटन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या क्षेत्रातून नागरिकांची ये- जा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे पोलिस बंदोबंस्त वाढवावा. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजार असला, तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. दक्षता, सुरक्षित अंतर, मास्क वापरल्यास संसर्गापासून दूर राहू शकतो याविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रयोगशाळा कार्यान्वित
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले, गेल्या महिनाभरात जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली. तसेच उपचारासाठी शेवटच्या क्षणी दाखल झाल्याने रुग्ण मृत्यू दर अधिक आहे. जळगाव येथे स्वॅब नमुने तपासणीसाठी दोन कोटी रुपये खर्चून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी ही कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात भरती व्हावे. खासगी रुग्णालये सुरू होतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पॅनेलवरील खासगी रुग्णालयांनी या योजनेच्या लाभार्थ्यांना कॅशलेस सुविधा पुरवावी, असेही त्यांनी सांगितले.

अहवालाचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लागेल
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. कंटेन्मेन्ट झोनसह अन्य भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. स्वॅब नमुन्यांचे अहवाल तत्काळ उपलब्ध होण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रलंबित अहवालाचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लागेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. यावेळी खासदार श खडसे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार शिरीश चौधरी किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, सौ. लताताई सोनवणे यांनी विविध सूचना केल्या.

Web Title:  Task force to reduce corona mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.