तापी काठ परिसर करणार मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:36+5:302021-07-14T04:19:36+5:30
तापी वाचली तरच आपण सर्व शेतकरी वाचू. दिवसेंदिवस आपल्या भागात कमीअधिक प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे सर्वाना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी ...

तापी काठ परिसर करणार मतदानावर बहिष्कार
तापी वाचली तरच आपण सर्व शेतकरी वाचू. दिवसेंदिवस आपल्या भागात कमीअधिक प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे सर्वाना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी तापी नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते, असे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
गेली ३० वर्षे पाडळसरे तापी निम्न प्रकल्प हजारो कोटी रुपये खर्च करून आजतागायत पूर्ण झालेला नाही. त्या प्रकल्पाचे कामे अजूनही अपूर्ण आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत कोणताही राजकीय पुढारी खंबीरपणे उभा राहिला नाही. त्या प्रकल्पाचे नाव वापरून निवडून आलेले नेतेमंडळी सामान्य जनतेला पाणी प्रश्नावर वाऱ्यावर सोडतात. या सर्वांचा निषेध करून तापी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा, असा निर्णय तापी परिसर शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. तसेच तापी नदीत कायमस्वरूपी पाणी राहावे आणि त्यासाठी सरकारने धरण वा बॅरेज लवकरात लवकर बांधण्यासाठी आग्रह धरावा. जोपर्यंत कायमस्वरूपी पाण्याची सोय होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा तसेच तापी वाचवा- शेतकरी वाचवा या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या शेतकऱ्यांनी केले आहे.
बारमाही पाणी असणाऱ्या तापीमाईत आता फक्त ३ ते ४ महिनेच पाणी शिल्लक राहत असताना त्यावर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना अवलंबून आहेत. त्यामुळे सर्व तापी काठ परिसरात भर उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासत असून बागायत क्षेत्र कमी होत चालले आहे. आपल्या परिसरात शेती हाच प्रमुख व्यवसाय असताना नदीपात्रात पाणीच शिल्लक राहिले नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका बंद पडतील आणि त्यामुळे शेती विकून रोजगारासाठी शहराकडे जावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आंदोलन कठोरे
चोपडा येथील सामान्य शेतकऱ्यांनी तापी वाचवा-शेतकरी वाचवा या उद्देशाने आंदोलन सुरू केले आहे. यात कोणतीही राजकीय संघटना, शेतकरी संघटना यांचा सहभाग नाही. त्यामुळे सर्व शेतकरी, ग्रामस्थ, नाविक व मच्छीमार बांधव यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.